Ishan Kishan: ईशानने 'ब्रेक' घेण्यावर सोडलं मौन, टी20 वर्ल्डकपसाठी निवडीबाबतही मोठं भाष्य; वाचा काय म्हणाला

Ishan Kishan on Break: ईशान किशन गेल्या काही महिन्यात त्याने क्रिकेटमधून घेतलेल्या ब्रेकमुळे चर्चेत होता, पण आता त्यानेच याबाबत भाष्य केले आहे.
Ishan Kishan
Ishan KishanSakal
Updated on

Ishan Kishan News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत अनेक खेळाडू आपली छाप पाडताना दिसत आहेत. यामध्ये ईशान किशनचाही समावेश आहे. मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान सध्या शानदार फॉर्ममध्ये खेळत आहे.

त्याने नुकतेच गुरुवारी (11 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध 34 चेंडूत 69 धावांची खेळी केली. यानंतर आगामी टी20 वर्ल्डकपसाठी त्याच्या निवडीबद्दलही चर्चा सुरू झाली, याबाबत त्यानेच प्रतिक्रिया दिली असून अनेक गोष्टी खेळाडूंच्या हातात नसल्याचे त्याने म्हटले आहे.

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये जून महिन्यात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे.

या स्पर्धेतील निवडीसाठी ईशाननेही दावा ठोकला आहे. पण तरी तो याबाबत फार विचार करत नसल्याचे त्याने म्हटले आहे.

ईशान म्हणाला, 'टी20 वर्ल्डकपचं म्हणाल, तर ते काही माझ्या हातात नाही, मी आता अनेक गोष्टींचा सहज साध्यापद्धतीने विचार करत आहे. तुम्हाला एकावेळी एकाच सामन्याचा विचार करणे महत्त्वाचे असते. ही गोष्टही लक्षात घ्यायला हवी की अनेक गोष्टी खेळाडूंच्या हातात नसतात.'

Ishan Kishan
IPL 2024 Points Table: दिल्लीने लखनौवरील विजयाने सोडलं शेवटचं स्थान, चेन्नईलाही फायदा; बेंगळुरूचं मात्र मोठं नुकसान

ईशान यापूर्वी नोव्हेंबर 2023 मध्ये भारताकडून अखेरचा खेळला आहे. त्याने 2023 च्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान त्याने ब्रेकची मागणी केली होती. त्यानंतर त्याला भारताच्या संघात संधी देण्यात आली नाही.

त्याने यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये डीवाय पाटील टी20 कप स्पर्धेतून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. त्यानंतर आता तो आयपीएल 2024 स्पर्धेत खेळताना दिसला आहे.

याबाबत बोलताना इशान म्हणाला, 'मी ब्रेकदरम्यान सराव करत होतो. जेव्हा तुम्ही जेव्हा ब्रेक घेता, तेव्हा लोक याबाबत खूप गॉसिप करतात, सोशल मीडियावरही अनेक गोष्टींबाबत बोलले जाते.'

'पण मला वाटते की हे समजणेही महत्त्वाचे आहे की सर्व गोष्टी खेळाडूंच्या हातात नसतात. आम्ही फक्त या ब्रेकचा सर्वोत्तम उपयोग करू शकतो. मी तरी हीच मानसिकता स्विकारली आहे.'

Ishan Kishan
T20 World Cup: ICC ने केली टी-20 वर्ल्डकपच्या अँथमची घोषणा; सीन पॉल अन् केससह दिसणार अनेक सुपरस्टार, पाहा टीझर

दरम्यान इशानने ब्रेकदरम्यान देशांतर्गत क्रिकेटही खेळले नव्हते. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास बीसीसीआयने सांगितले होते, परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचमुळे त्याला बीसीसीआयच्या वार्षिक करारातही स्थान मिळाले नाही.

या सर्व घटनांनंतर ईशानने म्हटले आहे की 'मला कोणाला काही सिद्ध करून दाखवायचे आहे, असे काही नाहीये. मला फक्त मैदानात जाऊन खेळाची मजा घ्यायची आहे. आपल्या हातात नाहीत, अशा सर्व गोष्टींचा ज्यादाचा दवाब स्वत:वर न टाकण्यास मी शिकलो आहे. तुमच्या नियंत्रणात काय आहे आणि तुमच्या नियंत्रणाबाहेर काय आहे, या गोष्टी कळायला हव्यात.'

दरम्यान ईशानने आयपीएल 2024 स्पर्धेत आत्तापर्यंत 5 सामने खेळले असून 32.20 च्या सरासरीने 161 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.