Ambati Rayudu-Kevin Pietersen: इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
या व्हिडिओमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील अंतिम सामन्यानंतर लाईव्ह शोमध्ये केवीन पीटरसन अंबाती रायुडूला जोकर म्हणताना दिसला होता. याबाबत आता पीटरसनने स्पष्टीकरण दिले आहे.
झाले असे की अंतिम सामन्याआधी रायुडूने हैदराबादला पाठिंबा दर्शवण्यासाठी नारंगी रंगाचे जॅकेट घातले होते. पण कोलकाता जिंकल्यानंतर त्यांने हे जॅकट बदलून निळ्या रंगाचे जॅकेट घातले.
त्यावरून या सामन्यात समालोचन टीममध्ये असलेला इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केवीन पीटरसन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडन यांनी रायुडूची मस्करी केली होती. याच मस्करीच्या मुडमध्ये असताना जॅकेट बदलण्यावरून पीटरसनने रायुडूला जोकर म्हटले होते.
मात्र, त्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सकडून रायुडूवर अपमानजनक कमेंट्स करण्यात आल्या. यानंतर आता पीटरसनच रायुडूच्या समर्थनार्थ उतरला आणि त्याने हे सर्व थांबवण्यास सांगितले आहे.
त्याने ट्वीट केले की 'कम ऑन, सोशल मीडियावर भारतीय खेळाडूंबरोबर किंवा त्याच्याविरुद्ध होत असलेल्या टीकेची गती कमी करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ अंबाती रायुडू आणि मी आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर एकमेकांशी बोलत होतो. त्यावेळी झालेली मस्करी अचानक अंबातीप्रती गैरवर्तनात बदलली. कृपया हे बंद करा.'
रायुडू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांनीही टीका केली होती. यामागे कारण म्हणजे रायुडूने काही दिवसांपूर्वी बंगळुरू संघावरही टीका केली होती. त्याने बंगळुरू संघाच्या व्यवस्थापनावर निशाणा साधला होता.
तसेच त्याने असेही म्हटले होते की ऑरेंज कॅपने आयपीएल ट्रॉफी जिंकता येत नाही. त्याच्या या कमेंट्समुळेही तो चर्चेचा विषय ठरला होता. रायुडूने गेल्यावर्षी निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर तो यंदा आयपीएलमध्ये समालोचन करताना दिसला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.