IPL 2024 KKR Vs RCB : बेंगळुरूच्या पदरी निराशाच! कोलकाताने अवघ्या एका धावेनं दिला पराभवाचा धक्का

KKR Vs RCB : आयपीएल 2024 मधील 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध एका धावेने रोमांचक विजय मिळवला.
Kolkata Knight Riders
Kolkata Knight RidersSakal
Updated on

IPL 2024 KKR Vs RCB:

आयपीएल 2024 मधील 36 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर झाला. या सामन्यात कोलकाताने अवघ्या 1 धावेने विजय मिळवला.

या सामन्यात कोलकाताने बेंगळुरूसमोर 223 धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करताना बेंगळुरूला 20 षटकात सर्वबाद 221 धावाच करता आल्या.

दरम्यान, बेंगळुरूचा हा आठ सामन्यांतील एकूण सातवा पराभव आहे, तर सलग सहावा पराभव आहे. त्यामुळे बेंगळुरू गुणतालिकेत अखेरच्या क्रमांकावर कायम असून त्यांच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

कोलकाताने मात्र यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली असून त्यांनी सात सामन्यांतील ५ सामने जिंकले असून 2 सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे कोलकाता सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

आयपीएलच्या 17 व्या हंगामातील कोलकाताचा बेंगळुरूविरुद्धचा हा दुसरा विजय आहे. यापूर्वी बेंगळुरूला झालेल्या सामन्यात कोलकाताने 7 विकेट्सने विजय मिळवला होता.

बेंगळुरूकडून या सामन्यात विल जॅक्स (55) आणि रजत पाटीदार (52) यांनी अर्धशतके केली. कोलकाताकडून गोलंदाजी करताना आंद्रे रसेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर सुनील नारायण आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्क आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

IPL 2024 KKR Vs RCB Live Score : बेंगळुरूच्या पदरी निराशाच! कोलकाताने अवघ्या एका धावेनं दिला पराभवाचा धक्का

शेवटच्या षटकात कर्ण शर्माने मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत आशा उंचावल्या होत्या. परंतु, पाचव्या चेंडूवर तो झेलबाद झाला.

अखेरच्या चेंडूवर 1 चेंडूवर 3 धावांची गरज असताना फर्ग्युसन आणि सिराज यांनी दोन धावांसाठी पळत असताना फर्ग्युसन धावबाद झाला. त्यामुळे कोलकाताने एका धावेने विजयावर शिक्कामोर्तब केले.

IPL 2024 KKR Vs RCB Live Score :  रसेलने धाडलं कार्तिकला माघारी

अखेरीस दिनेश कार्तिकने कर्ण शर्माला साथीला घेत बेंगळुरूला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला परंतु, 19 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आंद्रे रसेलने दिनेश कार्तिकला बाद केले.

बाद होण्यापूर्वी कार्तिकने या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकत बेंगळुरुच्या आशा उंचावल्या होत्या. परंतु, तो बाद झाल्याने बेंगळुरुच्या गोटात शांतता पसरली. कार्तिक 18 चेंडूत 25 धावांवर बाद झाला.

IPL 2024 KKR Vs RCB Live Score : राणाने प्रभूदेसाईला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता; बेंगळुरू-कोलकाता सामना रोमांचक वळणावर

मधल्या षटकात मोठे धक्का बसल्यानंतर सुयश प्रभूदेसाई आणि दिनेश कार्तिक यांनी डाव सांभाळला होता. त्यांनी संघाला 180 धावांचा टप्पाही पार करून दिला होता. परंतु, असे असतानाच हर्षित राणाने त्यांची भागीदारी तोडली.

त्याने 18 व्या षटकाच 18 चेंडूत 24 धावा करणाऱ्या सुयश प्रभूदेसाईला माघारी धाडले. त्यामुळे 16 चेंडूत 36 धावांची बेंगळुरूला विजयासाठी गरज आहे. तर कोलकाताला 3 विकेट्सची गरज आहे.

IPL 2024 KKR Vs RCB Live Score : बेंगळुरूला धक्क्यांवर धक्के! रसेलनंतर आता नारायणनेही एकाच षटकात दोन फलंदाजांना धाडलं माघारी

जॅक्स-पाटीदार बाद झाल्यानंतर कॅमेरॉन ग्रीने आणि सूयश प्रभूदेसाईने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु 13 व्या षटकात सुनील नारायणने तिसऱ्या चेंडूवर कॅमेरॉन ग्रीनला रमनदीप सिंगच्या हातून झेलबाद केले. ग्रीनने ६ धावा केल्या. यानंतर शेवटच्या चेंडूवर त्याने महिपाल लोमरोरलाही 4 धावांवर माघारी धाडले. लोमरोरचा झेल नारायणनेच घेतला.

त्यामुळे 13 षटकांनंतर बेंगळुरुच्या 6 बाद 155 धावा झाल्या आहेत. लोमरोर बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक फलंदाजीला आला आहे.

IPL 2024 KKR Vs RCB Live Score : रसेलने एकाच षटकात दिले दोन धक्के! बेंगळुरूच्या अर्धशतकवीर जॅक्स-पाटीदारला धाडलं माघारी

जॅक्सपाठोपाठ पाटीदारनेही 21 चेंडूत अर्धशतक केले होते. परंतु, 11 व्या षटकात आंद्र रसेल गोलंदाजीला आला आणि त्याने पहिल्या चेंडूवर विल जॅक्सला माघारी धाडले. जॅक्सचा झेल अंगक्रिश रघुवंशीने घेतला. त्याने 32 चेंडूच 4 चौकार आणि 5 षटकारांसह 55 धावांची खेळी केली.

इतकेच नाही, तर याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर रसेलने पाटीदारलाही बाद केलं. पाटीदारनेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण बॅकवर्ड पॉइंटला हर्षित राणाने त्याचा झेल घेतला. पाटीदारने 23 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांसह 52 धावा केल्या.

IPL 2024 KKR Vs RCB Live Score : विराट-फाफ आऊट झाल्यानंतर जॅक्सने झळकावलं ताबडतोड अर्धशतक, पाटीदारनेही दिली दमदार साथ

विराट आणि फाफ डू प्लेसिस बाद झाल्यानंतर बेंगळुरूचा डाव विल जॅक्स आणि रजत पाटीदारने सांभाळला. जॅक्सने 29 चेंडूत ताबडतोड अर्धशतक झळकावले. त्याला पाटीदारहीने आक्रमक खेळत साथ दिली. त्यामुळे बेंगळुरूने 10 षटकांच्या आतच 120 धावांचा टप्पा पार केला.

IPL 2024 KKR Vs RCB Live Score : बेंगळुरूला मोठा धक्का! विराटपाठोपाठ कर्णधार डू प्लेसिसही स्वस्तात परतला माघारी

विराट बाद झाल्यानंतर चौथ्या षटकात वरुण चक्रवर्ती गोलंदाजीला आला. त्याने त्याच्या पहिल्याच चेंडूवर फाफ डू प्लेसिसला चकवले. त्याने टाकलेल्या चेंडूवर डू प्लेसिसला मिड-ऑनला मारायचे होते, परंतु, त्याचवेळी वेंकटेश अय्यरने डावीकडे सूर मारत जमीनीलगत शानदार झेल घेतला. त्यामुळे फाफ डू प्लेसिसला 7 चेंडूत 7 धावा करून माघारी परतावे लागले.

IPL 2024 KKR Vs RCB Live Score : बेंगळुरूला मोठा धक्का! आक्रमक खेळणारा विराट कोहली आऊट

कोलकाताने दिलेल्या 223 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी बेंगळुरूकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस सलामीला फलंदाजीला उतरले होते. विराटने आक्रमक सुरुवातही केली होती.

मात्र, तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हर्षित राणाने त्याला बाद केले. राणाने आपल्याच चेंडूवर त्याचा झेल घेत बाद केले. त्यामुळे विराट 7 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार मारून 18 धावांवर बाद झाला.

दरम्यान, यावेळी विराटचे म्हणणे होते की हा नो-बॉल होता. त्यामुळे रिव्ह्यू देखील पाहाण्यात आला, ज्यात हा वैध चेंडू ठरवण्यात आला. त्यामुळे विराटला बाद होऊन माघारी जावे लागले. यादरम्यान विराट अत्यंत चिडलेला दिसला.

कोलकाताचे बेंगळुरूसमोर 223 धावांचे टार्गेट

आयपीएल 2024 मधील 36 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 222 धावा केल्या आहेत आणि बेंगळुरूसमोर 223 धावांचे आव्हान ठेवले आहे. कोलकाताकडून या सामन्यात श्रेयस अय्यरने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली, तर सॉल्टने 48 धावा केल्या.

बेंगळुरुकडून यश दयाल आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तसेच मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

IPL 2024 KKR Vs RCB Live Score : कर्णधार श्रेयसच्या अर्धशतकानंतर रमनदीप-रसेलचे आक्रमण, कोलकाताचे बेंगळुरूसमोर 223 धावांचे टार्गेट

कर्णधार श्रेयस अय्यर अर्धशतक करून बाद झाल्यानंतर 19 व्या षटकात रमनदीपने दोन षटकार आणि एका चौकारासह आक्रमण केले. त्यानंतर 20 व्या षटकात रसेलनेही आक्रमक खेळताना चार चौकार मारले.

त्यामुळे कोलकाताने 20 षटकात 6 बाद 222 धावा केल्या आणि बेंगळुरूला 223 धावांचे आव्हान दिले. रमनदीप 8 चेंडूत 20 धावा करून नाबाद राहिला, तर आंद्रे रसेल 20 चेंडूत 27 धावा करून नाबाद राहिला.

IPL 2024 KKR Vs RCB Live Score : अर्धशतक पूर्ण करून श्रेयस अय्यर बाद; पण अद्यापही रसेलचा धोका कायम, कोलताची 200 धावांकडे वाटचाल

रिंकू बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर आंद्रे रसेलला नो-बॉलमुळे जीवदान मिळाले होते. त्याचा नंतर रसेलने चांगला फायदा घेतला. त्याने संयमी खेळ करत कर्णधार श्रेयस अय्यरला साथ दिली होती. श्रेयसनेही चांगला खेळ करत अर्धशतक पूर्ण केले.

परंतु, अर्धशतक झाल्यानंतर लगेचच त्याला 18 व्या षटकात कॅमेरॉन ग्रीनने बाद केले. श्रेयसने 36 चेंडूत 50 धावांची खेळी केली. 18 षटकात कोलकाताने 6 बाद 186 धावा केल्या.

IPL 2024 KKR Vs RCB Live Score : रिंकू सिंगही 24 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये

कोलकाताचा डाव कर्णधार श्रेयस अय्यरसह रिंकू सिंगने सवरला होता. रिंकू सिंगने आक्रमक खेळही केला. परंतु, त्याला फार काळ खेळपट्टीवर लॉकी फर्ग्युसनने टिकू दिले नाही. 14 व्या षटकाच्या पहिलाच चेंडू फर्ग्युसनने स्लोअर टाकला.

ज्यावर रिंकूने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.परंतु शॉर्ट फाईन-लेगला यश दयालने त्याचा झेल घेतला. रिंकूने 16 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 24 धावा केल्या.

कॅमेरॉनने कोलकाताला दिला चौथा धक्का, रिंकू सिंग आला फलंदाजीला

एकाच षटकात दोन विकेट्स गमावल्यानंतर कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांनी डाव सावरला होता. परंतु, त्यांचीही जोडी फार काळ कॅमेरॉन ग्रीनने टिकू दिली नाही.

त्याने 9 व्या षटकात वेंकटेश अय्यरला महिपाल लोमरोरच्या हातून झेलबाद केले, त्यामुळे रिंकू सिंग फलंदाजीला आला आहे. दरम्यान, 9 व्या षटकात कोलकाताने 100 धावांचा आकडा पार केला आहे.

IPL 2024 KKR Vs RCB Live Score : एकाच षटकात दयालचे कोलकाताला दुहेरी धक्के; बेंगळुरूला पॉवर-प्लेमध्ये मिळाल्या 3 विकेट्स

दरदार सुरुवातीनंतर कोलकाताच्या धावगतीला बेंगळुरूच्या गोलंदाजांनी लगाम घातला. सॉल्ट बाद झाल्यानंतर पॉवर-प्लेच्या शेवटच्या म्हणजेच डावाच्या 6 व्या षटकात यश दयालने दोन विकेट्स घेतल्या. त्याने धोकादायक सुनील नारायणला आणि अंगक्रिश रघुवंशीला बाद केले.

नारायणचा 10 धावांवर दुसऱ्या चेंडूवर विराटने, तर रघुवंशीचा 3 धावांवर सहाव्या चेंडूवर कॅमेरॉन ग्रीनने शानदार झेल घेतला. 6 षटकात कोलकाताने 3 बाद 75 धावा केल्या आहेत.

IPL 2024 KKR Vs RCB Live Score : सिराजने रोखलं सॉल्टचं तुफान अन् थोडक्यात हुकलं अर्धशतक; 5 षटकातच कोलकाताच्या 60 धावा पार

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या कोलकाताकडून फिल सॉल्ट आणि सुनील नारायण यांनी डावाची सुरुवात केली. यावेळी एकिकडून नारायणने संयमी खेळ केलेला असतानाच सॉल्टने आक्रमण केले. त्याने चौकार-षटकारांची बरसात केली.

परंतु, 5 व्या षटकात त्याचे वादळ मोहम्मद सिराजने रोखले. सिराजच्या गोलंदाजीवर सॉल्ट 48 धावांवर बाद झाला. त्याने 14 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने ही खेळी केली.

त्याच्या खेळीमुळे बेंगळुरूने 5 षटकात ६३ धावा केल्या आहेत.

IPL 2024 KKR Vs RCB Live Score : असे आहेत बेंगळुरू-कोलकाताची प्लेइंग-11

कोलकाता नाईट रायडर्स - फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद सिराज

IPL 2024 KKR Vs RCB Live Score : फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2024 Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru Live Score : आयपीएल 2024 मधील 36 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानात म्हणजेच ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे.

कोलकाता संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर आरसीबी संघ शेवटच्या स्थानावर आहे. आरसीबी संघ या हंगामात अजून पण दुसऱ्या विजयाच्या शोधात आहे. जर आरसीबी हा सामना हरला तर त्यांच्यासाठी प्लेऑफचे दरवाजे जवळपास बंद होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.