Rahmanullah Gurbaz: कोलकाता नाईट रायडर्स संघाने इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे रविवारी (26 मे) विजेतेपद पटकावले. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाताने सनरायझर्स हैदराबादला 8 विकेट्सने पराभूत करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले.
कोलकाताच्या विजयात सलामीवीर रेहमनुल्लाह गुरबाजने मोलाचा वाटा उचलला. त्याने कोलकाताकडून 114 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 39 धावांची खेळी केली. तसेच त्याने अर्धशतक करणाऱ्या वेंकटेश अय्यरबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारीही केली.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की गुरबाजची आई सध्या आजारी आहे. तिच्या तब्येत बिघडल्याने गुरबाज आयपीएल 2024 च्या मध्यातच अफगाणिस्तानालाही परतला होता. पण फिल सॉल्ट पाकिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी इंग्लंडला परत गेल्यानंतर गुरबाज पुन्हा कोलकाता संघात सामील झाला आणि त्याने सॉल्टची जागा घेतली.
आई आजारी असतानाही त्याने धैर्य दाखवत कोलकातासाठी शानदार खेळ केला. तो मागच्यावेळीही म्हणाला होता की कोलकाता कुटुंबालाही माझी गरज होती. तसेच त्याने सांगितले होते की तो रोज आईशी बोलतो.
दरम्यान, अंतिम सामन्यानंतरही त्याने खुलासा केला की सामन्यापूर्वी तो आईशी बोलला होता. त्याने सांगितले की 'मला वाटते की ती मला पाहात असेल, ती आता ठीक आहे. सामन्याआधी मी तिच्याशी बोललो आणि तिला काय हवे आहे विचारले, तेव्हा ती म्हणाली फक्त विजय बाकी काही नको.'
कोलकाताकडून सॉल्टनेही चांगली कामगिरी केली होती. त्याने 12 सामन्यांत 435 धावा ठोकल्या. त्याच्या कामगिरीचेही गुरबाजने कौतुक केले. तो म्हणाला, 'सॉल्टीही खूप चांगला खेळला. वर्ल्ड कप येत आहे, त्यामुळे मला त्यासाठी सज्ज व्हायचा हेतू होता. त्याचबरोबर जर सॉल्ट जर नसेल, तरी मला तयार राहायचे होते.'
तसेच गुरबाजसाठी हे दुसरे आयपीएल विजेतेपद ठरले आहे. यापूर्वी त्याने 2022 मध्ये गुजरात टायटन्सकडून आयपीएल विजेतेपद जिंकले होते. याबद्दलही त्याने आनंद व्यक्त केला.
दरम्यान, गुरबाज आणि वेंकटेश अय्यर यांच्या खेळीमुळे कोलकाताने 114 धावांचे लक्ष्य 10.3 षटकातच 2 विकेट्स गमावत पूर्ण केले. त्यामुळे कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला. यापूर्वी कोलकाताने 2012 आणि 2014 साली आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.