नवी दिल्ली : कर्णधार संजू सॅमसनला झेलचीत देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला असला तर तो बाद झाल्यानंतरही दिल्लीविरुद्धचा सामना आमच्या इतर फलंदाजांनी जिंकून द्यायला हवा होता, अशी खंत राजस्थान रॉयल्स संघाचे संचालक कुमार संगकारा यांनी व्यक्त केली.
फिरोजशा कोटला मैदानावर झालेल्या या सामन्यात सॅमसनने ४६ चेंडूत ८६ धावांची आक्रमक खेळी साकार केली. यात त्याने आठ चौकार आणि सहा षटकार मारले; पण १६व्या षटकात नाट्य घटले. सॅमसनला सीमारेषवर झेल शेय होपने पकडला; परंतु त्यावेळी त्याचा पाय सीमारेषेला लागला की नाही हे स्पष्ट होत नव्हते.
टीव्ही पंच मिचेल गॉफ यांनी केवळ दोन अँगल्स पाहिले त्यामध्ये त्यांना होपचा पाय सीमारेषेला लागल्याचे जाणवले नाही, त्यामुळे अधिक अँगल न पाहता त्यांनी झेल वैध असल्याचे सांगत सॅमसनला बाद ठरवले. या निर्णयामुळे सॅमसनही अचंबित झाला तो लगेचच मैदानावरील पंचांजवळ गेला आणि पुन्हा रिव्ह्यू घेण्यास सांगत होता; परंतु त्याची विनंती फेटाळण्यात आली आणि निर्णय कायम ठेवण्यात आला.
कधी कधी अशा निर्णायक क्षणी कॅमेराचे अँगल महत्त्वाचे असतात. काही अँगलमधून पाय सीमारेषेला लागल्याचे जाणवते; परंतु ते टीव्ही पंचांना निर्णय बदलण्यास पुरेसे ठरत नाहीत. सॅमसनबाबत हे घडले तेव्हा सामना नाजूक स्थितीत होता. शेवटी पंचांचा निर्णय मान्य करून पुढे जायचे असते, असे संगकारा यांनी सांगितले.
पंचांनी एकदा दिलेला निर्णय बदलला जात नाही. त्यामुळे सॅमसन बाद झाला तरीही इतर फलंदाजांनी घडलेली घटना विसरून संघाला विजय मिळवून देण्याचे ध्येय पूर्ण करायला हवे होते, संगकारा यांनी स्पष्ट केले.
सॅमसनला मोठा दंड
पंचांच्या निर्णयावर नाराज झालेल्या सॅमसनने त्याला बाद ठरवण्यात आल्यावर पंचांकडे जाऊन विचारणा केली. पुन्हा रिव्ह्यू घ्यावा, अशीही तो मागणी करत होता. अशाप्रकारे पंचांचा निर्णय काही काळासाठी न स्वीकारल्याबद्दल सामनाधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई केली आणि सामना मानधनातील ३० टक्के रक्कम कापण्याचा दंड केला.
दिल्लीचे आव्हान कायम
सॅमसन मैदानात असेपर्यंत दिल्लीविरुद्धचा हा सामना जिंकण्याची राजस्थानला संधी होती. विजय मिळवला असला तर त्यांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला सनसनाटी विजय मिळाल्यामुळे दिल्लीचे आव्हान कायम आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.