Lucknow Super Giants Fan: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत मंगळवारी (२३ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) सामना झाला. या सामन्यात लखनौने शेवटच्या षटकात 6 विकेट्सने विजय मिळवला.
लखनौचा हा चेन्नईविरुद्धचा यंदाच्या हंगामातील दुसरा विजय आहे. तसेच लखनौ आयपीएलच्या 17 व्या हंगामात चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करणारा पहिला संघही ठरला. याचदरम्यान, लखनौच्या या विजयाचा आनंद एका चाहत्याने जोरदार साजरा केला, त्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
खरंतर चेन्नई संघाला एमएस धोनीच्या लोकप्रियतेमुळे संपूर्ण भारतभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. अशात चेन्नईला चेपॉकच्या स्टेडियमवर मोठा प्रतिसाद मिळणार हे साहजिक आहे. अपेक्षेनुसार चेपॉक स्टेडियम चेन्नईच्या समर्नार्थ पूर्ण पिवळं झाल्याचंही दिसून आलं.
मात्र असं असतानाही हजारो चेन्नईच्या चाहत्यांमध्ये बसलेल्या एका लखनौच्या चाहत्याने मात्र सर्वांचे लक्ष वेधले.
या सामन्यात लखनौला विजयासाठी अखेरच्या 2 षटकात 32 धावांची गरज होती. अशात लखनौकडून शतकी खेळी करणारा मार्कस स्टॉयनिस फलंदाजी करत होता, तर त्याला दीपक हुडा साथ देत होता.
या दोघांनी मिळून 10 चेंडूतच या 32 धावा पूर्ण केल्या आणि लखनौला विजयापर्यंत पोहचवले. यावेळी चेन्नईच्या चाहत्यांमध्ये बसलेल्या त्या लखनौच्या चाहत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्याने निराश झालेल्या चाहत्यांमध्येच त्याने आनंदाने नाचायला सुरुवात केली. त्याचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
इतकेच नाही, तर असाच एक लहान मुलगा अनेक चेन्नईच्या चाहत्यांमध्ये लखनौला पाठिंबा देत असतानाचा व्हिडिओ लखनौ संघानेच सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 210 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 60 चेंडूत 108 धावांची नाबाद खेळी केली. तसेच शिवम दुबेने 66 धावांची खेळी केली. लखनौकडून मॅट हेन्री, मोहसीन खान आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग लखनौने 19.3 षटकात 213 धावा करत पूर्ण केला. लखनौकडून मार्कस स्टॉयनिसने 63 चेंडूत सर्वाधिक 124 धावांनी नाबाद खेळी केली.
चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने 2 विकेट्स घेतल्या, तर दीपक चाहर आणि मुस्तफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (LSG fan celebrate victory against CSK)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.