IPL 2024 MI vs LSG : मुंबई संघाच्या गोलंदाजीची दुर्दशा कायम;निकोलस पूरनच्या झंझावाती फलंदाजीमुळे लखनौच्या २१४ धावा

जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत यंदाच्या आयपीएल मोसमातला आपला अखेरचा सामना खेळतानाही मुंबई संघाच्या गोलंदाजीची दुर्दशा कायम राहिली.
IPL 2024 MI vs LSG
IPL 2024 MI vs LSGsakal
Updated on

मुंबई : जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत यंदाच्या आयपीएल मोसमातला आपला अखेरचा सामना खेळतानाही मुंबई संघाच्या गोलंदाजीची दुर्दशा कायम राहिली. निकोलस पूरनच्या झंझावाती ७५ आणि के. एल. राहुलच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर लखनौने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद २१४ धावा उभारल्या.

लखनौच्या डावाची दोन टप्प्यांत विभागणी झाली. पहिल्या १० षटकांत ३ बाद ६९ आणि पुढच्या १० षटकांत ५ बाद १४५ अशी फटकेबाजी त्यांनी केली. पूरन आणि राहुल या दोघांनी ४४ चेंडूंत १०९ धावांची भागीदारी करून मुंबईची गोलंदाजी निष्प्रभ केली. मुंबईने लखनौला प्रथम फलंदाजी दिली. नुवान तुषाराने पहिल्याच षटकांत देवदत्त पडिक्कलला बाद केले. त्यानंतर मार्कस स्टॉयनिसने ५ चौकारांसह २८ धावा करूनही पहिल्या १० षटकांत त्यांची ३ बाद ६८ अशी अवस्था करून मुंबईने पकड मिळवली होती; परंतु १० व्या षटकात निकोलस पूरन फलंदाजीस आला आणि तो मुंबईच्या गोलंदाजांना पुरून उरला.

पूरन हा धोकादायक फलंदाज आहेच. त्याने दडपण न घेता सुरुवातीपासूनच पलटवार करण्यास सुरुवात केली. अंशुल कंबोज हा मुंबईसाठी महागडा गोलंदाज ठरला. पूरनने त्याच्यावर पहिला हल्ला केला आणि त्याच्या एका षटकात २२ धावा कुटल्या, तरीही १३ षटकांत लखनौच्या खात्यात ११५ धावाच झाल्या होत्या.

अर्जुन तेंडुलकर त्याच्या तिसऱ्या षटकासाठी डावाच्या १५ व्या षटकात गोलंदाजीस आला आणि चित्र कमालीचे बदलले. दोन चेंडू टाकल्यांतर तो ड्रेंसिंग रूममध्ये परतला. त्याचे उर्वरित षटक (४ चेंडू) नमन धीरने पूर्ण केले; परंतु पूरनने ४ षटकारांसह एकूण २९ धावा फटकावल्या. तेथेच लखनौचा संघ द्विशतकी धावा करणार, हे निश्चित झाले होते. सुदैवाने पूरन, अर्शद खान आणि के. एल. राहुल सलग तीन चेंडूंवर बाद झाले; पण आयुष बदोनी आणि कृणाल पंड्या यांनी लखनौच्या खात्यात २१४ धावा जमा केल्याच.

संक्षिप्त धावफलक

लखनौ : २० षटकांत ६ बाद २१४ (के. एल. राहुल ५५ - ४१ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार, मार्कस स्टॉयनिस २८ - २२ चेंडू, ५ चौकार, निकोलस पूरन ७५ - २९ चेंडू, ५ चौकार, ८ षटकार, आयुष बदोनी २२ - १० चेंडू, १ चौकार, २ षटकार, नुवान तुषारा ४-०-२८-३, पियूष चावला ४-०-२९-३)

अर्जुन तेंडुलकरसाठी १४ चेंडूंचाच सामना

मुंबईचे आव्हान असेही संपुष्टात आल्यामुळे या लढतीत जसप्रीत बुमराऐवजी अर्जुन तेंडुलकरला संधी देण्यात आली. त्याने पहिल्या दोन षटकांत १२ धावाच देत चांगली गोलंदाजी केली होती; परंतु तिसऱ्या षटकासाठी तो गोलंदाजीस आला आणि पहिला चेंडू टाकण्याअगोदर त्याच्या पायाचा स्नायू आखडला. काही वेळ उपचार घेतले खरे; परंतु पुढचे दोन चेंडू फुलटॉस होते आणि पूरनने दोन्ही चेंडूंवर षटकार ठोकले. त्याला पुढे गोलंदाजी करणे शक्य होत नव्हते. परिणामी अर्जुनसाठी हा सामना १४ चेंडूंचाच ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.