MS Dhoni 4 ball 20 Runs Knock Chennai Super Kings Defeat Mumbai Indians : चेन्नईकडून सर्वाधिक धावा कुणी केल्या... ऋतुराजनं! चेन्नईसाठी सर्वाधिक भागीदारी कुणाची... ऋतु अन् शिवमची! चेन्नईकडून सर्वाधिक विकेट्स कुणी घेतल्या... पथिरानानं! तरीसुद्धा 4 बॉल खेळणाऱ्या धोनीमुळं चेन्नईचा विजय कसा काय झाला?
मुंबई-चेन्नई सामना जसा व्हायला पाहिजे तसा झाला. हार्दिकनं नाणेफेक जिंकली तरी सामना ऋतुराजच्या चेन्नईन खिशात घातला. या सामन्यात ना टॉस ना ड्यू फॅक्टर कामाला आलं इथं फक्त अन् फक्त दर्जेदार क्रिकेट चेन्नईला तारून गेलं.
मुंबईनं पॉवर प्लेमध्ये दमदार गोलंदाजी करत चेन्नईला म्हणाव्या तशा धावा करू दिल्या नाहीत. त्यानंतर ऋतुराज अन् शिवमनं चेन्नईच्या डावाला गती दिली. या दोघांनी 15 षटकात 150 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र त्यानंतर शेवटच्या चार षटकात (26 चेंडूत) चेन्नईला फक्त 36 धावाच करता आल्या होत्या.
शेवटच्या षटकाच्या चार चेंडूत चेन्नई फार मजल मारेल असं वाटत नव्हतं. मात्र धोनीनं बाजीच पलटवली. त्यानं हार्दिक पांड्याच्या या चार चेंडूत 20 धावा ठोकल्या. सलग तीन षटकार अन् शेवटच्या चेंडूवर 2 धावा करत थलानं चेन्नईची धावसंख्या 206 धावांपर्यंत पोहचवली.
हार्दिक पांड्या काही डेथ बॉलर स्पेशलिस्ट नाही. तो पॉवर प्लेमध्ये नवीन चेंडू टाकून असंही काही मोठं धन पाडणारा गोलंदाज नाही. त्यानं गप्प मधल्या षटकात आपल्या गोलंदाजीचा कोटा पूर्ण करावा. मात्र कर्णधार झाल्यापासून त्याला कधी नवीन चेंडू टाकण्याचा तर कधी शेवटचं षटक टाकण्याचा मोह होतो.
चेन्नईविरूद्ध त्यानं तब्बल 7 गोलंदाज वापरले तरी त्याला डेथ ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहनला राखून ठेवता आलं नाही. इथंच त्याच्या कॅप्टन्सीचा दर्जा दिसून येतो.
आता मुंबईच्या बॅटिंगकडं वळू या! मुंबईनं पॉवर प्लेमध्ये जशी ताकद दाखवायला पाहिजे तशी ती दाखवली. त्यांनी सहा षटकात नाबाद 63 धावा ठोकल्या. यातही रोहित शर्माच्या 42 धावांचं मोठं योगदान होतं.
मात्र त्यानंतर चेन्नईनं हळूहळू मुंबईच्या फलंदाजांना वेसन घालायला सुरूवात केली. पथिरानानं तर इशान किशन अन् सूर्यकुमार यादव हे दोन तगडे फलंदाज बाद करत मुंबईच्या धावगतीला ब्रेक लावला. त्यानंतर तिलक वर्मा आणि रोहित शर्मानं मुंबईची गाडी पाचव्या गिअरमध्ये नेण्याचा प्रयत्न केला.
मात्र पथिरानानं पुन्हा स्पीड ब्रेक करत तिलक वर्माची शिकार केली. यानंतर मुंबईकर मात्र चेन्नईकडून खेळणऱ्या शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडेनं ज्यावेळी धावांची गती वाढवायची त्यावेळी रोहितला शांत ठेवण्यात यश मिळवलं. 15 व्या षटकात ठाकूरनं फक्त 2 धावा दिल्या. तर 16 व्या षटकात देशपांडेनं 3 धावा देत रोहितला टेन्शनमध्ये आणलं.
हार्दिक कुचकामी ठरल्यानंतर टीम डेव्हिडनं रोहितचं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र मार खाऊनही मुस्तफिजूरनं डेव्हिडसमोर शरणागती पत्करली नाही. त्यानं 5 चेंडूत 13 धावा करणाऱ्या डेव्हिडला बाद केलं. पराभवाची भीती मुंबईच्या मनात घर करू लागली. रोहित मोठे फटके मारण्यासाठी धडपडत होता. मात्र सीएसकेच्या पोरांनी त्याच्या मुसक्या चांगल्याच आवळल्या होत्या.
साथीला आता तसं कोण राहिलं नव्हतं. तरी रोहित लढत होता. त्यानं शतक पूर्ण केलं. तो 63 चेंडू खेळून 105 धावांवर नाबाद राहिला. चांगल्या स्ट्राईक रेटसाठी आग्रही असलेल्या रोहितला मात्र आजच्या सामन्यात तब्बल 10 षटके खेळूनही म्हणावी तशी मोठी झेप घेता आली नाही. चेन्नईच्या पोरांनी दमदार गोलंदाजी केली.
मात्र चेन्नईच्या विजयात अन् मुंबईच्या पराभवात एक मोठा फरक दिसून आला. मुंबईचा परभाव 20 धावांनी झाला या 20 धावा धोनीच्याच होत्या. त्यानं शेवटच्या 4 चेंडूत या 20 धावा ठोकल्या होत्या. यामुळंच शेवटच्या षटकात मुंबईसमोर आवाक्याबाहेरचं आव्हान आलं. इथं जरी 10 धावा कमी असत्या तर सामन्याचं चित्र वेगळं असतं कारण रोहित नाबाद होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.