Pakistan vs New Zealand: न्यूझीलंड संघाने नुकताच पाकिस्तान दौरा केला. या दौऱ्यात दोन्ही संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना शनिवारी (27 एप्रिल) पाकिस्तानने 9 धावांनी जिंकला.
पाकिस्तानच्या या विजयामुळे 5 सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताने विजय मिळवलेला. परंतु, तिसरा आणि चौथा सामना न्यूझीलंडने जिंकत मालिकेत आघाडी मिळवली होती.
त्यामुळे न्यूझीलंडला पाचवा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याची संधी होती. मात्र, पाकिस्तानने पाचवा सामना जिंकत मालिका बरोबरीत सोडवली आणि मायदेशात मालिका पराभवाची मानहानी टाळली. या विजयासह पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावावर एक विश्वविक्रमही झाला आहे.
बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानने 44 वा टी20 विजय मिळवला आहे. त्याचमुळे बाबरने आता आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. तो युगांडाच्या ब्रायन बसाबासह या यादीत संयुक्तपणे अव्वल क्रमांकावर आहे.
मसाबानेही आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये कर्णधार म्हणून 44 विजय मिळवले आहेत. बाबर आणि मसाबा यांच्यापोठोपाठ या विक्रमाच्या यादीत असगर अफगाण आणि ओएन मॉर्गन आहे. या दोघांनीही कर्णधार म्हणून प्रत्येकी 42 टी20 विजय मिळवले आहेत.
44 विजय - ब्रायन मसाबा (56 सामने)
44 विजय - बाबर आझम (76 सामने)
42 विजय - असगर अफगाण (52 सामने)
42 विजय - ओएन मॉर्गन (72 सामने)
41 विजय - रोहित शर्मा (54 सामने)
41 विजय - एमएस धोनी (72 सामने)
दरम्यान, पाचव्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजीला उतरला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 178 धावा केल्या.
पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 69 धावांची खेळी केली. तसेच फखर जमानने 43 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत झॅकरी फौक्स, विल्यम ओरौर्क, बेन सिअर्स, ईश सोधी आणि जिमी निशम यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाचा डाव 19.2 षटकात 169 धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून टीम सिफर्टने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली, तसेच जॅक क्लार्कसनने नाबाद 38 धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त कोणालाही खास काही करता आले नाही. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.