आयपीएल क्वॉलिफायर-१ सामन्यात कोलकता संघाकडून झालेला एकतर्फी पराभव लवकरात लवकर विसरून पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिंसने आपल्या सहकाऱ्यांना दिला आहे.
आयपीएलची अंतिम फेरी गाठायची असेल तर हैदराबदला आता शुक्रवारी होणारा क्वॉलिफायर-२ हा सामना जिंकावा लागणार आहे. यंदाच्या मोसमात तीन वेळा अडीचशे पार धावा करण्याचा पराक्रम करणाऱ्या हैदराबाद संघाने मंगळवारी झालेल्या सामन्यात कोलकतासमोर शरणागती स्वीकारली. आठ विकेट आणि ३८ चेंडू राखून त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
कोलकताप्रमाणे हैदराबादचाही संघ यंदाच्या स्पर्धेतील ताकदवर संघ म्हणून समजला जात होता; पण फलंदाजी आणि गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात त्यांची कामगिरी घसरली.
ट्वेन्टी-२० प्रकारात असा एखादा दिवस येतो तेव्हा काहीच तुमच्या बाजूने घडत नाही. आमच्या काही फलंदाजांनी सुरुवात बऱ्यापैकी केली; परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. अपेक्षा होती तशी फलंदाजी झाली नाही, तसेच गोलंदाजीतही अपयशी ठरलो, अशी कबुली कमिंसने सामन्यानंतर दिली.
यंदाच्या स्पर्धेत आम्ही सर्व परिस्थितीत खेळलो आहोत. आता पुढचा सामना आम्हाला चेन्नईत खेळायचा आहे. येथे आम्हाला चांगले यश मिळू शकेल, त्यामुळे अहमदाबादमध्ये झालेला पराभव आम्ही लवकरात लवकर विसरणार आहोत, असे कमिंसने सांगितले.
ऑस्ट्रेलिया संघातील कमिंसचा साथीदार मिचेल स्टार्क या सामन्यात सर्वोत्तम ठरला. त्याने भेदक मारा करून ट्रॅव्हिस हेड, नितीश रेड्डी आणि शाहबाझ अहमद यांना आल्यापायी मागे पाठवले. पॉवर प्लेमध्येच ही दाणादाण उडाल्याने हैदराबाद संघाला सावरता आले नाही.
पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करणे विजयाचा मार्ग तयार करत असतो, आम्ही दोन्ही संघ पॉवर प्लेमध्ये दरारा निर्माण करणारे आहोत; पण मंगळवारच्या सामन्यात आम्ही तेथेच कमजोर ठरलो. आता क्वॉलिफायर-२ सामन्यात आम्हाला पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीतही प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे, असे कमिंस म्हणाला.
अशी आखली रणनीती ः स्टार्क
ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी फारच आक्रमक फलंदाजी केली आहे, बॅटच्या थोडे दूर असलेल्या चेंडूवर त्यांचा बहर अधिक होता; परंतु आम्ही या सामन्यात चेंडू हलकेच स्वींग करून त्यांना फटकेबाजीसाठी चेंडू दूर ठेवले नाही. यष्टींच्या मधोमध आणि खोलवर टप्पा ठेवला. आमचे फिरकी गोलंदाजही तेवढेच यशस्वी ठरले, असे सामन्यातील सर्वोत्तम मिचेल स्टार्कने आपल्या रणनीतीबाबत सांगितले. ट्रॅव्हिस हेडला शून्यावर बाद करता आले हे माझे सुदैव. तो लवकरात लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला हे आमचे भाग्य ठरले. असे प्रसंग वारंवार येत नाहीत, असेही स्टार्क म्हणाला.
कोलकता संघाकडून आम्हाला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागलेला असला तरी आम्ही आक्रमक पवित्र्याशी तडजोड करणार नाही, असाच खेळ आम्ही क्वॉलिफायर-२ या सामन्यातही करू, असा विश्वास हैदराबाद संघाचे सहायक प्रशिक्षक सायमन हेलमॉट यांनी व्यक्त केला. गेल्या दोन सामन्यात हेड शून्यावर बाद झालेला असला तरी तो पुढच्या सामन्यात अधिक जोमाने फलंदाजी करेल, असेही ते म्हणाले.
ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल स्टार्क यांच्यातील द्वंद्वाबाबत हेलमॉट म्हणतात, दोघेही लढवय्ये आणि आक्रमक वृत्तीचे खेळाडू आहेत. अशा खेळाडूंमधील लढत नेहमीच प्रेक्षणीय असते; परंतु यात एकाचाच विजय होतो. मंगळवारच्या सामन्यात स्टार्कचा विजय झाला एवढेच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.