Pat Cummins Speech: सोमवारी (15 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात ऐतिहासिक सामना पार पडला. एम चिन्नास्वामी स्टेडियनवर झालेल्या या सामन्यात तब्बल 549 धावांचा आणि 81 बाऊंड्रीचा पाऊस पडला.
पण अखेर या मोठ्या धावसंख्याच्या सामन्यात विजय सनरायझर्स हैदराबादच्या पदरी पडला. सनरायझर्स हैदराबादने हा सामना 25 धावांनी जिंकला.
या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने ड्रेसिंग रुममध्ये आपल्या संघाचा आत्मविश्वास वाढवणारे भाषण केले. याचा व्हिडिओही सनरायझर्स हैदराबादने शेअर केला आहे.'
बेंगळुरूविरुद्ध विजय मिळवल्यानंतर कमिन्स म्हणाला, 'मी हे नेहमीच म्हणत आलो आहे की आपल्याला अशाच प्रकारे खेळायचे आहे. प्रत्येक सामन्यात असा खेळ फायद्याचा ठरणार नाही, पण मी हे सांगू शकतो की जेव्हापण आपल्याविरुद्ध सामना खेळायचा असेल, तेव्हा प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरलेली असते. आणि काही संघांना आपल्याला ते मैदानात उतरण्यापूर्वीच सामन्यातून बाहेर करायचे असते. हा एक शानदार दिवस होता. मस्त.'
खरंतर कमिन्सला गेल्या काही महिन्यांपासून कर्णधार म्हणून कमालीचे यश मिळाले आहे. त्याने कसोटी चॅम्पियनशीप, वर्ल्डकप अशा मोठ्या आयसीसी स्पर्धा जिंकल्या. दरम्यान, तो आयपीएल 2024 मधून पहिल्यांदाच टी20 संघाचेही नेतृत्व करताना दिसत आहे.
यापू्र्वी त्याने कधीही टी20 क्रिकेटमध्ये नेतृत्व केले नव्हते. पण असे असले तरी त्याने सनरायझर्स हैदराबादचे आत्तापर्यंत ज्याप्रकारे नेतृत्व केले आहे, त्यातून त्याने प्रभाव पाडला आहे. त्याच्या नेतृत्वात हैदराबादने आत्तापर्यंत 6 सामन्यांपैकी 4 सामन्यांत विजय मिळवले आहेत.
दरम्यान, बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने 20 षटकात 3 बाद 287 धावा केल्या होत्या. ही विक्रमी धावसंख्या उभारण्यात ट्रेविस हेड (102) आणि हेन्रिक क्लासेनने (67) मोलाचा वाटा उचलला होता. ही आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्याही ठरली.
या कामगिरीबद्दल कमिन्स म्हणाला, 'आपण हे नेहमीच म्हणत आहोत की आपल्याला खूप निर्भयपणे आणि आक्रमक खेळायचे आहे, मोकळेपणाने खेळायचे आहे आणि तुम्ही फलंदाज तुमच्या बॅटने तशी कामगिरी करत आहात, जे खूप अफलातून आहे.'
दरम्यान, या सामन्यात बेंगळुरूने 288 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 षटकात 7 बाद 262 धावा केल्या होत्या. या सामन्यात कमिन्सही गोलंदाजी करताना 3 विकेट्स घेतल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.