Liam Livingstone : इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे आता एकिकडे प्लेऑफची चुरस वाढत असतानाच दुसरीकडे काही संघांवर स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की ओढावली आहे. पंजाब किंग्स संघाचेही आयपीएलच्या या 17 व्या हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे.
याबरोबरच आता त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू लियाम लिव्हिंगस्टोन उर्वरित आयपीएल हंगामातून बाहेर झाला आहे. पंजाब प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकले नसले, तरी त्यांचे अद्याप 2 सामने बाकी आहेत.
लिव्हिंगस्टोन सध्या गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करत आहे. त्यातच इंग्लंडला 22 मे पासून पाकिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळायची असून त्यानंतर टी20 वर्ल्ड कपही सुरू होणार आहे. अशात लिव्हिंगस्टोन इंग्लंड संघातील महत्त्वाचा भाग असल्याने त्याने सध्या विश्रांती देण्याला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पसंती दिली आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार लिव्हिंगस्टोनची दुखापत गंभीर नसली, तरी त्याच्याबाबत जोखीम न पत्करण्याचा इंग्लंड क्रिकेट संघव्यवस्थापनाने घेतला आहे.
लिव्हिंगस्टोनला या दुखापतीमुळे आयपीएल 2024 मधील कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स यांच्याविरुद्धच्या सामन्यांनाही मुकावे लागले. तसेच त्याला केवळ 7 सामन्यांत सहभागी होता आले. यातही त्याला फार काही खास कामगिरी करता आलेली नाही. त्याने 22च्या सरासरीने केवळ 111 धावाच करता आल्या आहेत.
दरम्यान, आयपीएल 2024 मधून बाहेर पडल्यानंतर लिव्हिंगस्टोनने पोस्टही शेअर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिले की 'आणखी एका वर्षासाठी आयपीएल संपलं. अगामी वर्ल्ड कपसाठी माझ्या गुडघ्याची समस्या दूर करावी लागणार आहे.'
'पंजाब किंग्सच्या चाहत्यांना त्यांनी दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. वैयक्तिकरित्या आणि संघ म्हणूनही हा निराशाजनक हंगाम राहिला. पण नेहमीप्रमाणे आयपीएल खेळतानाच्या प्रत्येक मिनिटाचा मी आनंद घेतला.'
पंजाबला आता उर्वरित 2 सामन्यांमधील एक सामना 15 मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना खेळायचा आहे, तर 19 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना खेळायचा आहे.
सध्या पंजाब किंग्स संघ पाँइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. त्यांनी 12 सामन्यांतील केवळ 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचे 8 पाँइंट्सच आहेत. त्यामुळे किमान शेवटचा क्रमांक टाळण्याचा प्रयत्न पंजाबचा असणारा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.