IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईतलं चेपॉक स्टेडियम चेन्नई सुपर किंग्सचा बालेकिल्ला समजला जातो, या मैदानात चेन्नई संघाला हरवणं वाटतं तितकं सोपं नाही, पण पंजाब किंग्सने ते करून दाखवलं. आयपीएलच्या ४९ व्या सामन्यात पंजाबने चेन्नईला ७ विकेट्सने पराभूत केलं. इतकंच नाही, तर पंजाबने चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलंय.
ऐकताय हे खरं आहे. पंजाब आणि चेन्नई संघात झालेल्या गेल्या पाचही सामन्यात पंजाबशी खेळताना चेन्नईला नाकेनऊ आलेत. पंजाबने २०२१ पासून चेन्नईविरुद्ध आयपीएलमध्ये पराभव स्विकारलेला नाही.
चेन्नईविरुद्ध सलग ५ सामने जिंकण्याचा पराक्रम यापूर्वी फक्त मुंबई इंडियन्सने केला होता. मुंबईने २०१८-२०१९ दरम्यान चेन्नईला सलग ५ सामन्यांत पराभूत केलेलं.
बुधवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचं झालं, तर पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस जिंकत ऋतुराजच्या नेतृत्वातील चेन्नईला पहिल्यांदा बॅटिंगला बोलावलं. चेन्नईसाठी ऋतुराज आणि अजिंक्य रहाणेने तशी सुरुवात चांगली केलेली.
पण ९ व्या षटकात हरप्रीत ब्रारने अफलातून गोलंदाजी केली. त्यानं आधी रहाणेला बाद केलं आणि पुढच्याच चेंडूवर तुफान फॉर्ममध्ये असलेल्या शिवम दुबेला पायचीत पकडलं. दुबे चक्क पहिल्यांदाच आयपीएलमध्ये गोल्डन डकवर बाद झाला.
तिथून चेन्नईच्या फलंदाजीला गळती लागली आणि एकएक करत नियमित अंतरावर चेन्नईचे फलंदाज बाद होत गेले. तरी एक बाजू ऋतुराजने भक्कम सांभाळले आणि एकाकी लढत देत अर्धशतक झळकावलं. यासह त्याने या हंगामात ५०० धावांचा टप्पाही पार केलाय.
पण तोही बाद झाल्यावर या हंगामात बॅटिंगला आलं की चोपायचं असा मार्ग अवलंबलेल्या धोनीला रोखण्याचं अवघड काम पंजाबच्या राहुल चाहर आणि आर्शदीप सिंगने करून दाखवलं. त्यांनी धोनीला जखडून ठेवताना तो फार मोठे शॉट्स खेळणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली. त्यामुळे चेन्नईने कसेबसे का होईना पण १६२ धावा केल्या.
या मैदानात दव पडणार हे अपेक्षित होते, त्यामुळे दुसऱ्या डावात तुलनेने बॅटिंग सोपी होती. त्यातच चेन्नईला पहिल्याच ओव्हरला तगडा धक्का बसला. त्यांचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर दोनच चेंडू टाकून दुखापतीमुळे मैदानातून बाहेर गेला.
आधीच पाथिराना या सामन्याला दुखापतीमुळे मुकल्याने आणि दीपकही बाहेर गेल्याने चेन्नई चांगलीच अडचणीत सापडली. ऋतुराजला गोलंदाजीसाठी पर्याय शोधावे लागले. मैदान ओलं झाल्याने गोलंदाजांना फारशी मदत मिळत नव्हती.
अशावेळी पंजाबच्या फलंदाजांनीही हातातली संधी गमावली नाही. प्रभसिमरन लवकर बाद झाला, तरी जॉनी बेअरस्टो आणि रिली रुसोच्या फटकेबाजीने पंजाबसाठी विजय सोपा केला. ते दोघं बाद झाल्यानंतर पंजाबला विजयापर्यंत नेण्याची जबाबदारी सॅम करन आणि शशांक सिंगने फार जोखीम न घेता चोख बजावली.
तरी त्यांच्या समोर मुस्तफिजूरनं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केल खरा, पहिला सामना खेळणाऱ्या ग्लिसन आणि जडेजानेही चांगली गोलंदाजी केली. मात्र तरी पुरेशा धावा नसल्याने चेन्नईच्या हातून हा विजय निसटला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.