Team India T20 World Cup 2024 Squad : तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या रिंकू सिंग याला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी वगळण्यात आल्याने भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅरॉन फिन्च यांनी आश्चर्य व्यक्त केले; परंतु या आयपीएलमधील खराब फॉर्ममुळे रिंकूने स्थान गमावले असल्याचे मत माजी विक्रमी फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.
आयपीएलचे समाचोलन करत असला तरी भारतीय क्रिकेटमध्ये घडत असलेल्या घडामोडींवर नेहमीच भाष्य करत असलेल्या इरफानने रिंकू सिंगची बाजू घेतली. त्याने भारतीय संघासाठी अगोदर केलेल्या कामगिरीची दखल निवड समितीने घ्यायला हवी होती, असे तो म्हणाला.
या भारतीय संघाच चार फिरकी गोलंदाज निवडण्यात आले; परंतु महत्त्वाच्या रिंकू सिंगला का स्थान देण्यात आले नाही, याचे आश्चर्य अॅरॉन फिन्चने व्यक्त केले. रिंकू सिंगला जेवढ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती त्यात त्याने ठसा उमटवलेला आहे. टी-२० मध्ये त्याची सरासरी ६० किंवा ७० पेक्षा अधिक आहे, तसेच त्याचा स्ट्राईक रेटही उत्तम आहे, असे वेस्ट इंडीजचे माजी वेगवान गोलंदाज इयन बिशप म्हणाले.
सुनील गावसकर यांचे मत मात्र वेगळे ठरले. त्यांनी रिंकू सिंगची निवड न होण्यामागे आयपीएलमधील खराब फॉर्म हे कारण असल्याचे सांगितले. मुळात या आयपीएलमध्ये त्याला फलंदाजीची पुरेशी आणि चांगली संधी मिळालेली नाही, त्यामुळे त्याला फॉर्म दाखवता आलेला नाही, असे गावसकर यांनी म्हटले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली निवडलेला हा भारतीय संघ विश्वकरंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करेल, असा विश्वास गावसकर यांनी व्यक्त केला. भारतीय संघ समतोल आहे, त्यात अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. काही खेळाडू तर चांगली टोलेबाजी करू शकतील, असे आहेत. गोलंदाजीतही तेवढाच समतोलपणा आहे, असे गावसकर म्हणतात.
१५ खेळाडूंच्या संघात रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल असे चार फिरकी गोलंदाज निवडलेले असताना केवळ तीनच वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. उपकर्णधार म्हणून निवडण्यात आलेला हार्दिक पंड्या हा चौथा वेगवान गोलंदाज म्हणून जबाबदारी सांभाळेल, असे गावसकर यांनी म्हटले आहे.
या आयपीएलमध्ये हळूवार चेंडू (स्लोअर) अधिक प्रभावी ठरत आहेत. आक्रमक फलंदाजांनाही असे चेंडू मारणे कठीण जात आहे, त्यामुळे कदाचित तीनऐवजी चार फिरती गोलंदाज निवडले असावेत, असा अंदाज गावसकर यांनी व्यक्त केला.
रिंकू सिंगप्रमाणे शुभमन गिलच्याही आयपीएलमधील कामगिरीत चढ-उतार राहिले आहेत, त्यामुळे त्यालाही मुख्य संघात स्थान मिळालेले नाही, असे गावसकर यांनी सांगितले. गेल्या दोन ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील संघ आणि यंदाचा संघ यात मानसिकता आणि दृष्टिकोन यात फरक आहे. नवा दृष्टिकोन आणि कणखरपणा असलेला भारतीय संघ यंदाच्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत आपण पाहिला आहे. त्याच कणखर वृत्तीने या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत आपला संघ खेळेल, असेही गावसकर म्हणाले.
दुसरा संघही वर्ल्डकप जिंकेल
काही खेळाडूंना अंतिम संघात स्थान मिळाले नाही, अशी चर्चा आणि नाराजी व्यक्त केली जाते; परंतु हीच भारतीय संघाची ताकद आहे. वास्तविक आणखी एक संघ निवडला तर त्या संघातही विश्वकरंडक जिंकण्याची क्षमता आहे, असे गावसकर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.