SRH vs LSG IPL 2024 : ट्रॅव्हिस हेड (नाबाद ८९ धावा) व अभिषेक शर्मा (नाबाद ७५ धावा) या सलामीवीरांनी केलेल्या नाबाद १६७ धावांच्या धडाकेबाज भागीदारीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल लढतीत लखनौ सुपर जायंटस् संघावर ६२ चेंडू व दहा विकेट राखून विक्रमी विजय संपादन केला. हैदराबादने सातव्या विजयासह प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल केली. लखनौचा संघ सहाव्या पराभवासह सहाव्या स्थानी राहिला.
या सामन्यात अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड लखनौच्या गोलंदाजांसोबत खेळत असल्याचे दिसत होते. या दोघांची धमाकेदार फलंदाजी पाहून टीम इंडियाचा माजी महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही त्यांचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.
आणि त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली त्यात लिहिले की, 'यांच्या बॅटिंगला 'स्फोटक' म्हणणंही कमीच... हैदराबादने पहिल्यांदा बॅटिंग केली असती तर नक्कीच ३०० पेक्षा अधिक धावा केल्या असत्या.
लखनौकडून हैदराबादसमोर १६६ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा या सलामीवीरांच्या झंझावातात लखनौच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. दोघांनी लखनौच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. हेडने ३० चेंडूंमध्ये आठ चौकार व आठ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद ८९ धावांची देदीप्यमान खेळी केली. अभिषेकने २८ चेंडूंमध्ये आठ चौकार व सहा षटकारांसह नाबाद ७५ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. हैदराबादने दहा विकेट राखून दणदणीत विजयाला गवसणी घातली.
त्याआधी लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निकोलस पूरनने नाबाद ४८ धावांची आणि आयुष बदोनी याने नाबाद ५५ धावांची खेळी केल्यामुळे लखनौला २० षटकांत चार बाद १६५ धावा फटकावता आल्या. भुवनेश्वरकुमारने १२ धावा देत दोन फलंदाज बाद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.