Shubman Gill IPL 2023 : यंदाच्या मोसमात माझ्याकडून चांगली सुरुवात होत होती; परंतु मोठ्या धावा होत नव्हत्या. त्याचाच विचार करून मी खेळ केला आणि त्यात यश मिळवले, असे मत गुजरात टायटन्सकडून धावांची टाकसाळ सुरू करणाऱ्या शुभमन गिलने व्यक्त केले.
कमालीचा फॉर्मात असलेल्या गिलने आयपीएलमध्ये सलग दोन सामन्यांत शतके करण्याच्या विराट कोहलीच्या पराक्रमाशी बरोबरी तर केलीच, पण रविवारच्या सामन्यात विराटनेही केलेली शतकी खेळी झाकोळून टाकली. ५२ चेंडूंतील त्याच्या नाबाद १०४ धावांमुळे गुजरातने बंगळूरचा पराभव केला. त्यामुळे बंगळूरचे आव्हान संपुष्टात आले आणि मुंबईला प्ले ऑफमध्ये स्थान मिळाले.
आयपीएलच्या पहिल्या अर्धात मी ४० - ५० धावा करत होतो, परंतु मोठी खेळी होत नव्हती. आता आयपीएल अंतिम टप्प्यात असताना माझ्याकडून मोठ्या खेळी होत आहेत हे समाधान देणारे आहे, असे गिलने सामन्यानंतर सांगितले.
टी-२० प्रकारात फटके मारण्यात सातत्य ठेवावे लागते, परिस्थितीनुसार पवित्रा बदलत रहावा लागतो. रविवारच्या सामन्यात चेंडू काहीसा थांबून येत होता, तसेच चेंडू दवामुळे ओलसरही झला होता. त्यामुळे मी विचारपूर्वक फटके मारत होतो, असे गिल म्हणाला.
सलग दुसरी शतकी खेळी करताना गिलने विजय शंकरसह ७१ चेंडूत १२३ धावांची भागीदारी केली. शंकरनेही वेगवान ५३ धावा फटकावल्या. त्यामुळे गिलला दुसऱ्या बाजूने स्वतःची खेळी उत्तमरित्या उभारता आली. सुरुवातीला शंकर उताविळपणे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला काहीसे थांबून फटके मारण्याचा सल्ला दिला आणि लय सापडल्यानंतर त्याने फारच चांगली आक्रमक फटकेबाजी केली, असेही मत गिलने मांडले.
हार्दिककडून गिलचे कौतुक
गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने शुभमन गिलच्या शतकी खेळीचे कौतुक केले. आपल्या भात्यात असलेले फटके कधी आणि कसे मारायची याची गिलला चांगलीच जाण आहे, गिलचे एक वेगळे रूप आपल्याला यंदा दिसून येत आहे, असे हार्दिकने सांगितले. गिलच्या खेळीचे वर्णन करताना हार्दिक म्हणतो, गिलकडे मुळात फटक्यांची विविधता आहे, मोकळ्या जागेवर त्याची पेरणी तो व्यवस्थितपणे करतो. यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा आहे आणि त्याच्या अशा खेळीमुळे संघातील इतरांचाही आत्मविश्वास वाढतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.