Virat Kohli News: भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतात परतला आहे. त्याचे मुंबई विमानतळावर परतल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
मीडियातील रिपोर्ट्सनुसार विराट त्याच्या मुलाच्या जन्मासाठी त्याच्या कुटुंबासोबत लंडनला गेला होता. त्याला 15 फेब्रुवारी 2024 रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. हे त्याचे आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माचे दुसरे अपत्य असून त्याला वामिका नावाची 3 वर्षांची मुलगी देखील आहे. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव अकाय ठेवले आहे.
दरम्यान, 22 मार्चपासून आयपीएल 2024 स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेची तयारी सर्व फ्रँचायझींनी सुरू केली असून खेळाडू हळुहळू आपापल्या संघात हजेरी लावत आहेत.
विराट आयपीएलमध्ये खेळत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचेही अनेक खेळाडू बंगळुरूमध्ये आले आहेत. यात कर्णधार फाफ डू प्लेसिसचाही समावेश आहे. आता विराट आयपीएलसाठी संघाशी कधी जोडला जाणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
मीडियातील वृत्तानुसार बेंगलोर संघ 19 मार्चपासून सरावाला अधिकृत सुरुवात करणार असून त्यापूर्वी विराट संघात जोडला जाऊ शकतो. बेंगलोरला पहिला सामना २२ मार्चला चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध खेळायचा आहे. चेन्नईत होणाऱ्या या सामन्यानेच आयपीएल २०२४ स्पर्धेला सुरुवात होईल.
भारतीय संघाने नुकतीच जानेवारी ते मार्च 2024 दरम्यान इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली. या मालिकेत भारताने 4-1 अशा फरकाने विजय मिळवला. दरम्यान, या मालिकेत विराट भारतीय संघाचा भाग नव्हता.
खरंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी विराटची भारतीय संघात निवड झाली होती. परंतु, त्याने वैयक्तिक कारणाने अचानक या सामन्यांमधून माघार घेतली. तसेच त्याने नंतरचे तिन्ही कसोटी सामनेही न खेळण्याचा निर्णय घेतला. याबद्दल त्याने बीसीसीआय आणि भारतीय संघव्यवस्थापनाला पूर्वकल्पना दिली होती.
विराट अखेरीस जानेवारी 2024 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळला होता. त्यानंतर आता दोन दोन महिन्यांनी खेळताना दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.