मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा स्टार फलंदाज विराट कोहली यंदाच्या आयपीएल मोसमात चांगली कामगिरी करू शकला नाही. विराटने बंगळूरसाठी सात सामन्यांमध्ये अवघ्या ११९ धावा केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आता कोहलीवर टिप्पणी करताना त्याला विश्रांतीची नितांत गरज असल्याचे म्हटले आहे. ‘‘विराट सध्या मानसिक थकव्याच्या प्रभावाखाली आहे आणि त्याला क्रिकेटमधून विश्रांतीची नितांत गरज आहे, जेणेकरून तो पुढील सात-आठ वर्षे देशासाठी खेळू शकेल,’’ असे शास्त्री यांनी यावेळी म्हटले आहे.
‘कोहलीसारख्या खेळाडूला कोरोनामुळे एकाच ठिकाणी मर्यादित असलेल्या वातावरणात चांगली काळजी घेणे आवश्यक आहे,’ असेही शास्त्री यांना वाटते. ‘‘विराट कोहलीवर व्यस्ततेमुळे थकव्याचा प्रभाव जाणवतो, जर कोणाला विश्रांतीची सर्वाधिक गरज असेल तर तो कोहली आहे. त्याच्यामध्ये अजूनही भारतासाठी पुढील सहा-सात वर्षी चांगले क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी असो किंवा नंतर त्याने विश्रांती घ्यायला हवी,’ असे शास्त्री यांनी पुढे बोलताना म्हटले आहे.
मंगळवारी झालेल्या आयपीएल सामन्यात कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. ‘‘मी प्रशिक्षक असताना पहिल्यांदाच खेळाडूंकडे वैयक्तिकरित्या लक्ष देण्यास सुरुवात केली. खरंतर आपल्याला खेळाडूंबद्दल सहानुभूती दाखवण्याची गरज आहे. क्रिकेटपटूंनी स्वत:वर जबरदस्ती केल्यास ते त्यांच्यातील खेळाडू गमावून बसतात. त्यामुळेच ते आपले सर्वोत्तम देऊ शकत नाहीत,’’ असे शास्त्री यांनी पुढे बोलताना म्हटले आहे.
कोहलीने सोशल मीडियापासून दूर राहावे केविन पीटरसन
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसननेही शास्त्री यांच्याशी सहमती दर्शविताना, कोहलीला आपली नवीन ऊर्जा परत मिळवण्यासाठी काही काळ क्रीडा आणि सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. ‘‘कोहली अनेक गोष्टींमध्ये गुंतलेला असतो. तो या खेळाचा सर्वांत मोठा स्टार आहे. त्यामुळे त्याला काही काळ विश्रांतीची नितांत गरज आहे.’’ असे त्याने म्हटले.
शंभर सामन्यांचा दुष्काळ
विराट कोहलीला मागील १०० सामन्यांमध्ये शतक झळकाविता आलेले नाही. यामध्ये १७ कसोटी, २१ एकदिवसीय, २५ टी-२० व ३७ आयपीएल लढतींचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.