IPL 2024, LSG vs PBKS: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 11 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स संघात खेळवला जाणार आहे. लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.
दरम्यान, हा सामना पंजाबचा यंदाच्या हंगामातील तिसरा सामना आहे, तर लखनौचा दुसरा सामना आहे. दरम्यान, लखनौ यंदा पहिल्यांदाच घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्यामुळे ते घरच्या मैदानात पहिला विजय मिळवण्यासाठी उत्सुक असतील. दरम्यान, या सामन्यात लखनौचा संघ पंजाब किंग्सविरुद्ध का वरचढ ठरू शकतो, याचा आढावा घेऊ.
लखनौचे मैदान हे गोलंदाजांना साथ देणारे आहे. पण असे असले, तरी जर खेळपट्टीवर टिकून राहून धावा केल्या, तर धावफलकावर चांगल्या धावा लागू शकतात. फलंदाजी फळीचा विचार करायला झाल्यास लखनौची फलंदाजी पंजाबपेक्षा अनुभवी आणि तगडी आहे.
त्यातही केएल राहुल आणि क्विंटन डीकॉक हे धीम्या गतीच्या या खेळपट्टीवर लखनौची ताकद ठरू शकतात. पहिल्या सामन्यातही राहुलने अर्धशतक केले होते. त्यामुळे त्याच्याकडून या सामन्यातही अशीच अपेक्षा असेल. जर केएल राहुल आणि डी कॉक चांगली सुरुवात देऊ शकले, तर लखनौसाठी ही मोठी जमेची बाजू ठरेल.
लखनौच्या मधल्या फळीत आयुष बडोनी, निकोलस पूरन, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस आणि कृणाल पंड्या असे फलंदाज फलंदाजी करू शकतात. हे सर्वच खेळाडू आक्रमक खेळासाठी ओळखले जातात. त्यामुळे ही लखनौची सर्वात मोठी ताकद आहे.
पूरन चांगल्या फॉर्ममध्येही आहे. जर केएल राहुल आणि डीकॉक यांच्याकडून चांगली सुरुवात मिळाली, हे मधली फळी संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाऊ शकते किंवा लक्ष्याचा पाठलागही सहज करू शकते.
याशिवाय फलंदाजांमधील स्टॉयनिस, पंड्या, हुडा हे गोलंदाजीतही योगदान देऊ शकतात. पण हुडा या सामन्यात केवळ फलंदाज म्हणून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. त्याच्याऐवजी एक प्रमुख गोलंदाज इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवला जाऊ शकतो.
या तुलनेत पंजाबच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाल्यास त्यांच्याकडे शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंग, सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांचे पर्याय आहेत. परंतु, त्यांच्या फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य दिसलेले नाही, त्यामुळे ही गोष्ट त्यांच्या विरोधात जाऊ शकते.
पंजाबची एकूण गोलंदाजी पाहिली, तर ती लखनौपेक्षा सरस आहे. त्यातच खेळपट्टीही गोलंदाजांना पोषक असल्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. परंतु, जर लखनौची फलंदाजीतही सखोलता असल्याने त्यांच्याकडे मोठी धावसंख्या उभारण्याची ताकद आहे.
त्यामुळे हा सामना पंजाबची गोलंदाजी विरुद्ध लखनौची फलंदाजी असा दिसू शकतो. पंजाबकडे हरप्रीत ब्रार, कागिसो कबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग यांच्याबरोबरच लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन हे अष्टपैलूही गोलंदाजीत योगदान देऊ शकतात.
दरम्यान, लखनौच्या गोलंदाजांमध्ये सातत्य नसले, तरी जर खेळपट्टीवर चांगली साथ मिळाली, तर त्यांचीही गोलंदाजी बहरू शकतो. यातही रवी बिश्नोई आणि नवीन-उल-हक यांच्या गोलंदाजीवर लक्ष राहिल.
स्टॉयनिसची वेगवान गोलंदाजीही या सामन्यात लखनौसाठी महत्त्वाची ठरू शकते. त्याचबरोबर यश ठाकूर आणि मोहसिन खान यांनाही लय सापडली, तर लखनौची गोलंदाजी फळीही कमाल करू शकते.
लखनौ आणि पंजाब यांच्यात आत्तापर्यंत 3 सामने खेळवले गेले आहेत. यातील 2 सामन्यात लखनौने 2 विजय आणि पंजाबने 1 विजय मिळवला आहे. महत्त्वाचे म्हणजे पंजाबने जो एक विजय मिळवला आहे, तो एकाना स्टेडियमवरच मिळवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.