MS Dhoni News: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 34 वा सामना शुक्रवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनौने 8 विकेट्सने विजय मिळवला. पण असे असले तरी या सामन्यात चेन्नईकडून एमएस धोनीने केलेल्या तुफानी फटकेबाजीने अनेकांची मनं जिंकली.
या सामन्यात धोनी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. यावेळी त्याने 9 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 28 धावांची खेळी केली. दरम्यान, धोनीने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरण्याची यंदाच्या हंगामातील ही पहिली वेळ नाही.
खरंतर धोनी आयपीएल 2024 मध्ये सातत्याने 6,7 किंवा 8 अशा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला उतरताना दिसला आहे. विशेष म्हणजे खालच्या क्रमांकावर फलंदाजीला करतानाही धोनीने आक्रमक खेळ आत्तापर्यंत केला आहे.
त्यामुळे अनेकांच्या मते धोनीचा सध्याचा फॉर्म पाहाता, त्याने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवे. परंतु, तो असे का करत नाही, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता याचे उत्तर चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी दिले आहे.
लखनौविरुद्धच्या सामन्यानंतर फ्लेमिंग यांनी सांगितले की धोनी अद्याप त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे.
फ्लेमिंग म्हणाले, 'तो यंदाच्या हंगामात ज्याप्रकारे फलंदाजी करतोय आणि अगदी नेट्समध्येही जशी फलंदाजी करतो, ते प्रेरणादायी आहे. तो जे करत आहे, ते पाहून संघाला आश्चर्य वाटलेले नाही. त्याने हंगामाच्या पूर्वी झालेल्या तयारीतही दाखवलेलं कौशल्य शानदार होते.'
'त्याला गेल्या वर्षात गुडघ्याच्या दुखापतीने ग्रासलं होतं. तो अद्यापही त्यातून सावरत आहे. त्याचमुळे तो काही मर्यादीत चेंडूच चांगले खेळू शकतो. मला वाटते प्रत्येकालाच त्याला अधिक काळ पाहायचे आहे, आम्हालाही. पण तो घेत असलेला वेळच योग्य आहे, कारण आम्हाला त्याची संपूर्ण हंगामात गरज आहे.'
याशिवाय फ्लेमिंग यांनी असंही म्हटलं की धोनी 2-3 षटकात जो केमियो पार पाडतो, त्याने संघाला चांगल्या स्थितीत नेण्यास मदतच मिळते. तसेच तो जेव्हा मैदानात येथे तेव्हाचं वातावरणही शानदार असते.
फ्लेमिंग म्हणाले, 'त्याने जे काही आत्तापर्यंत मिळवलंय त्याचा अभिमान वाटतो आणि त्याला जेवढे प्रेम मिळत आहे, ते पाहून आम्ही सर्वच जण चकीत आहोत. तो आमच्या संघाचा भाग आहे, याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि तो म्हणजे आमच्या संघाचा श्वास आहे.'
दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर चेन्नईकडून धोनीव्यतिरिक्त रविंद्र जडेजाने 57 धावांची नाबाद खेळी केली, तसेच अजिंक्य रहाणेने 36 धावांची, तर मोईन अलीने 30 धावांची खेळी केली. त्यामुळे चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या. गोलंदाजीत लखनौकडून कृणाल पांड्याने 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग लखनौने 19 षटकात 2 विकेट्स गमावत पूर्ण केला. लखनौकडून कर्णधार केएल राहुलने 82 धावांची खेळी केली, तर क्विंटन डी कॉकने 54 धावांच खेळी केली. चेन्नईकडून मुस्तफिजूर रेहमान आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (Why MS Dhoni batting at Lower Order in IPL 2024 CSK Coach Stephen Fleming reveals reason)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.