Yuzvendra Chahal IPL: आयपीएलमध्ये काही संघात झालेलं मोठे बदल नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. यातीलच एक म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने युजवेंद्र चहलला सोडण्याचा घेतलेला निर्णय.
युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये 2014 ते 2021 दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी शानदार गोलंदाजी केली होती. तो या संघाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही आहे. मात्र 2022 आयपीएल लिलावापूर्वी चहलला बेंगळुरूने करारमुक्त केले होते.
त्यानंतर लिलावात राजस्थानने त्याला संघात घेतले. दरम्यान चहलला बेंगळुरू संघातून कारर मुक्त करण्यामागील कारणाचा खुलासा माईक हेसन यांनी जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखातीत केला आहे.
माईक हेसन बेंगळुरूचे माजी क्रिकेट संचालक आणि प्रशिक्षक राहिले आहेत. 2022 आयपीएल लिलावावेळीही ते बेंगळुरू संघासह होते. त्यांनी सांगितले की चहलला पुन्हा संघात न घेतल्याच पश्चाताप आजही त्यांना होतो.
त्यांनी याबाबत सांगितले की 'आम्ही चहलला रिटेन केलं नव्हतं कारण फक्त 3 खेळाडू रिटेन केल्याने आम्हाला ज्यादाचे 4 कोटी रुपये खर्च करता येणार होते. त्यातून चहल आणि हर्षल पटेलला घेण्याचा आम्हाचा हेतू होता.'
हेसन यांनी सांगितले की लिलावात चहलचे नाव खूप उशीरा आले होते. तोपर्यंत बेंगळुरूने श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगाला संघात घेतलं होतं. चहलनंतर कोणत्याही फिरकीपटूमध्ये त्यांना रस नव्हता. हसरंगाचे नाव आधी आले, त्यामुळे बेंगळुरूने त्याच्यावर बोली लावली आणि त्याला घेतल्यानंतर चहलला घेता येणार नव्हते.
चहलला न घेतल्याबद्दल वाईट वाटल्याचे हेसन यांनी सांगितले. ते म्हणाले, 'युझी एक असा खेळाडू आहे, ज्याला न घेतल्याने मी जोपर्यत माझी कारकिर्दी संपत नाही तोपर्यंत किंवा त्यानंतरही निराश असेल. तो एक शानदार गोलंदाज आहे.'
दरम्यान, चहलने नुकतेच सोमवारी (22 एप्रिल) राजस्थानकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना आयपीएल कारकिर्दीत 200 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. हा टप्पा पार करणारा तो पहिलाच गोलंदाज बनला आहे.
चहलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 153 सामने खेळले. यातील 113 सामने त्याने बेंगळुरूकडून खेळले, ज्यात त्याने 139 विकेट्स घेतल्या. तसेच त्याने राजस्थान रॉयल्सकडून 2022 पासून 39 सामने खेळले असून 61 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याने सर्वात आधी आयपीएलमध्ये 2013 साली मुंबई इंडियन्सकडून एकमेव सामना खेळला होता, ज्यात त्याला विकेट घेता आली नव्हती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.