तिचे दोन्ही पाय निकामी आहेत. तरीही ती निराश नाही. कणखर मनोधैर्याच्या जोरावर ती टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होत आहे. ती अवघी १५ वर्षांची आहे. या स्पर्धेत देशाकडून सहभागी होणारी ती सर्वांत लहान जलतरणपटू. १०० मीटर आणि ४०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात ती ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करेल. ‘ईझी’ या टोपणनावाने ही वंडरगर्ल ओळखली जाते.
विशिष्ट आजार घेऊन जन्मलेली इसाबेल लहानपणापासून पायाने अधू होती. तो व्हिन्सेंट कुटुंबासाठी धक्काच होता; पण कुटुंबाने तिचे पालन एखाद्या फुलराणीप्रमाणे केले. आई-बाबा हेच विश्व असलेली इसाबेल दहाव्या वर्षी मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरी गेली. त्यातून तिने सावरताना बागडण्याचा मंत्र घेतला आणि ती व्हीलचेअरवरून जगाला सामोरी गेली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा जलतरणात उत्तम दबदबा आहे. त्यातून ती जलतरणाकडे वळली. गावातील जलतरणात मग सराव सुरू झाला. जलतरण हा आनंदाचा भाग होता. तेथील प्रशिक्षक अलाना फुलर यांनी तिच्या पंखांत जिद्दीचे बळ भरले आणि फुलराणीचे रूपांतर जलपरीत होण्यास सुरुवात झाली.
वर्षभरात तिने फ्री स्टाईल आणि बॅक स्ट्रोक्स प्रकारात उत्तम प्रगती केली. राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेतून चमक दाखविली. राष्ट्रीय शालेय स्पर्धा २०१८ मध्ये तिने कमाल करीत विविध प्रकारांत ८ सुवर्णपदके जिंकली. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेला सामोरे जाण्याची वेळ आली. सुदैवाने ती ऑस्ट्रेलियात झाली आणि तिची चांगली कामगिरी झाली. सर्व मर्यादा झुगारून दिवसभरात चार तास सराव आणि आनुषंगिक व्यायाम, त्यामध्ये शाळा, असा तिचा व्यग्र दिनक्रम झाला. पायांत ताकद नसल्यामुळे तिला सर्व काही हातांच्या बळावर निभावून न्यावे लागते.
काही महिन्यांपूर्वी तिची पॅरालिम्पिकसाठी चाचणी शिबिरासाठी निवड झाली आणि साऱ्या व्हिन्सेंट कुटुंबाला आनंदाचे भरते आले. घर आणि कुटुंबाच्या छत्रापासून ती प्रथमच दूर जात क्वीन्सलॅण्डमधील राष्ट्रीय शिबिरात दाखल झाली, तेव्हा तिला नव्या विश्वाला आपण गवसणी घालतोय, याचे प्रत्यंतर आले. घरापासून दूर असलो तरी निर्धाराने तिने या शिबिरात कसून सराव सुरू ठेवला. राष्ट्रीय निवड समितीला तिच्या प्रयत्नांचे मोठे कौतुक आहे. त्यांनी तिला ३२ जणांच्या संघात सहभागी करून घेतले आणि तिच्या छोट्या स्वप्नाचा एक मोठा टप्पा पूर्ण झाला. घर सोडून माहीत नसणारी मुलगी अवघ्या तीन वर्षांत एवढा मोठा टप्पा पार करेल, असे कुणालाही वाटले नव्हते; पण तिने अथक परिश्रमाने ते स्वप्न सत्यात आणले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.