भुवनेश्वर : खेळामधील अफाट गुणवत्ता असूनही खेळापासून दूर जात शिक्षणाला अधिक महत्त्व दिल्याची अनेक उदाहरणे आपल्या देशात आहेत, पण ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या ज्योतिका श्रीदांदी हिच्यासाठी हा प्रवास विरुद्ध दिशेने झाला आहे. तिला व्हायचे होते डॉक्टर; परंतु वडिलांच्या इच्छेखातर ती ॲथलेटिक्स खेळाडू झाली आहे.
आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील तानुकू गावामधील २३ वर्षीय ज्योतिकाने १० वीमध्ये ९७ टक्के गुण मिळवले. शालेय शिक्षणात नेहमीच प्रगती करत असणाऱ्या ज्योतिकाला डॉक्टर व्हायचे होते; परंतु आपल्या तारुण्यात शरीरसौष्ठवपटू असलले तिचे वडील श्रीनिवास राव यांनी आपल्या मुलीने ॲथलेटिक्समध्ये नाव कमवावे अशी इच्छा प्रकट केली. तुला ऑलिंपिकमध्ये खेळताना मला पाहायचे आहे, असे श्रीनिवास राव यांनी ज्योतिकाला सांगितले. त्यानंतर तिने आपला विचार बदलला.
येत्या पॅरिस ऑलिंपिकसाठी ज्योतिका महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीसाठी पात्र ठरली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला बहमास येथे झालेल्या जागतिक रिले शर्यतीतून ज्योतिका आणि तिच्या रिले संघाने पात्रता सिद्ध केली.
दहावीत ९७ टक्के गुण मिळाल्यानंतर शिक्षणात अधिक चांगले यश मिळवून डॉक्टर होण्याची इच्छा होती; परंतु वडिलांच्या इच्छेमुळे ॲथलेटिक्सकडे वळल्यावर, मला हा विचार सोडून द्यावा लागला, असे ज्योतिकाने सांगितले. ती सध्या येथे सुरू झालेल्या फेडरेशन करंडक ॲथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होत आहे.
माझ्यामध्ये ॲथलेटिक्सची गुणवत्ता आहे आणि मी ऑलिंपिकमध्ये देशाचे नाव उंचावू शकते, असे वडिलांना जाणवत होते. मला ॲथलेटिक्स खेळाडू तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि केलेला त्याग पाहता मी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला, असे ज्योतिकाने सांगितले.
मला खेळाडू नव्हे तर डॉक्टर व्हायचेय असे मी वडिलांना सांगितले नाही. कारण मला त्यांना दुःखी करायचे नव्हते. २०१७ पर्यंत मला खेळात कोणताही रस नव्हता; परंतु २०२० पासून माझ्यामध्ये खेळाची आवड निर्माण झाली.
- ज्योतिका
माझे वडील त्यांच्या तरुणपणी शरीरसौष्ठवपटू होते, मात्र कुटुंबाकडून कोणतेही प्रोत्साहन मिळत नसल्यामुळे त्यांनी हे क्षेत्र सोडून दिले. आता ते उद्योगपती आहेत आणि त्यांची खेळामधील आवड कमालीची आहे. माझ्याद्वारे ते त्यांचे खेळामधील स्वप्न पूर्ण करत आहेत. ऑलिंपिकमध्ये मी खेळावे ही त्यांची फार मोठी इच्छा आहे, असे ज्योतिकाने सांगितले.
वडिलांच्या अशा प्रोत्साहनामुळे मला इतर कोणत्याच गोष्टींचा विचार करावा लागत नाही. माझ्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची ते काळजी घेतात, असे सांगणाऱ्या ज्योतिकाची ४०० मीटर वैयक्तिक शर्यतीत ५२.७३ सेकंद अशी सर्वोत्तम वेळ आहे.
शाळेतील क्रीडा स्पर्धेत ज्योतिकाला धावताना वडिलांनी पाहिले आणि आपल्या मुलीमध्ये असलेली गुणवत्ता त्यांनी जाणली आणि तेथूनच ज्योतिकाचा हा प्रवास सुरू झाला. शाळेतील स्पर्धांत मी २०० आणि ४०० मीटर शर्यतीत पहिली यायचे. क्लबमधील स्पर्धांमध्येही माझा पहिला क्रमांक असायचा, असे ज्योतिका म्हणाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.