कोल्हापूर - केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाने दिलबहार तालीम मंडळ (अ)वर २ विरुद्ध १ गोलफरकाने विजय मिळविला. तर, ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.
शिवाजी विरुद्ध दिलबहार यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. उत्तरार्धात ‘दिलबहार’ने गोल बरोबरीसाठी आटोकाट प्रयत्न केले. ‘शिवाजी’चा गोलरक्षक मयूरेश चौगुले याने उत्कृष्ट गोलक्षेत्ररक्षण करत ‘दिलबहार’च्या चढाया परतवून लावल्या. ‘दिलबहार’च्या रोमॅरिकच्या पासवर शुभम माळीने ८ व्या मिनिटाला गोल केला. या गोलने शिवाजी संघाला धक्का बसला. ‘शिवाजी’कडून करण चव्हाण-बंदरे, संकेत जाधव, प्रथमेश कांबळे यांनी चढायांचा धडाका लावला. ‘शिवाजी’कडून विक्रम शिंदेने १४ व्या मिनिटाला फ्री किकवर गोलची परतफेड केली.
उत्तरार्धात ‘दिलबहार’च्या जावेद जमादारच्या पासवर व्हॅबीओने फटकावलेला चेंडू ‘शिवाजी’चा गोलरक्षक मयूरेशने अडवला. त्यानंतर ‘दिलबहार’च्या सनी सणगरच्या पासवर जावेद जमादारला गोलची सोपी संधी होती. तो शिवाजी संघाच्या गोलजाळीसमोर असूनही त्याने चेंडूला फटका मारण्यात ढिलाई केली. त्यानंतर शुभम माळी, रोमॅरिक, जावेद जमादारने गोल फेडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ‘शिवाजी’कडून करण चव्हाण-बंदरेने ५२ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. ‘ऋणमुक्तेश्वर’कडून अनिरुद्ध शिंदे, नीतेश गायकवाड, अक्षय शिंदे, ऋषिकेश पाडळकर, तर ‘उत्तरेश्वर’कडून अजिंक्य शिंदे, ओंकार कोकाटे, लखन मुळीक, अश्विन टाकळकर, सिद्धेश शिंदे यांनी गोलसाठी आटापिटा केला.
केएसएच्या आचारसंहितेत सामना वेळेत सुरू करणे बंधनकारक आहे. शिवाजी विरुद्ध दिलबहार यांच्यातील सामन्यात दोन्ही संघांनी मध्यंतरानंतर सामना सुरू करण्यास विलंब केला. त्यामुळे केएसएने दोन्ही संघांना विलंबाबद्दल समज दिली.
संबंधित बातम्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.