Maharashtra Kesari Kusti 2023 : घरात असणाऱ्या अठराविश्वे दारिद्रातून कुस्तीतला प्रवास करत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. दुनियेचे ओझे पाठीवर वाहणाऱ्या आपल्या बापाच्या कष्टाचे ऋण या यशाने फेडणाऱ्या मल्लाचे नाव म्हणजे सिकंदर शेख. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धात धडाकेबाज कामगिरी करत सिंकदरने सर्वांची मने जिंकली आहेत. महाराष्ट्रसह देशातील प्रत्येक प्रतिस्पर्धी मल्लांला त्याने आस्मान दाखवत देशातील आघाडीचा मल्ल तो बनला आहे.
हमाली करून वडीलांनी पुरवला खुराक...
सिकंदर मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा. घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा. पण या वारशावर दारिद्राची गडद छाया कायमची. घरात वडील रशिद शेख पैलवानकी करायचे. निमगावच्या मगरांच्या तालमीत सरावाला असताना तालीमीची स्वच्छता करायची आणि त्या बदल्यात तालमीतील मल्ल जो खुराक देतील, तो खायचा आणि सराव करायचा. असं सुरू असतानाच वडीलांची प्रकृती खालावली म्हणून रशीद घरी परतले आणि लग्नगाठ बांधली गेली. संसाराचा गाडा हाकत असतानाच दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत कायमचीच झाली. मात्र तेंव्हाही कुस्ती सोबतीला होती. पुन्हा कुस्ती लढायला त्यांनी सुरवात केली.
हमालीने थकलेलं शरीर सावरत आखाड्यात उतरले वडील...
कुस्तीत जिंकलेल्या इनामावर जगणं सुरू होते. त्यात संसारवेलीवर हुसेन आणि सिंकदर ही दोन फुले उमलली आणि मिळणाऱ्या बक्षीसांच्या रकमेवर चार जणांचे पोट भागेनासे झाले. त्यात त्यांनी स्थानिक मार्केट यार्डात हमालीचा पर्याय निवडला. दिवसभर हमाली करायचे, घाम गाळायचा पण कुस्तीची नशा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या लहानग्या मुलांना घेऊन आखाड्यात जाऊ लागले. हमालीने थकलेलं शरीर सावरत आखाड्यात उतरून मुलांना कुस्तीचे धडे देऊ लागले. सोबतीला वस्ताद चंदु काळेंचे मार्गदर्शनही मिळत होते.
भावाने वडिलांच्या हमालीचे ओझे घेतले पाठीवर...
सिंकदर अलीकडे चांगल्या कुस्त्या मारू लागला होता. चार पैसेही घरात येऊ लागले. त्यात सिंकदरच्या वडीलांना आजाराने गाठले आणि त्यांची हमाली थांबली. खुराकाला लागणाऱ्या पैशांची चणचण जाणवू लागली. हा प्रसंग येताच मोठा भाऊ हुसेनने आपली कुस्ती थांबवत वडीलाच्या हमालीचे ओझे आपल्या खांद्यावर घेतले. सिंकदर वडीलांचे स्वप्न उराशी बाळगुन कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत कुस्तीचे धडे गिरवू लागला. वस्ताद विश्वास हारूगले यांच्या मार्गदर्शनात तो एकेक डावपेच शिकु लागला. गावाकडून भावासोबत रमेश बारसकर, बाळू चौवरे यांच्याकडून आर्थिक पाठबळ मिळत होते. यातूनच सिंकदरने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, विद्यापीठस्तरीय स्पर्धा गाजवल्या. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी अनेक अनुभवी मल्लांना चितपट करण्याची किमया सिकंदरने साधली. आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर कमी वयात सिंकदर आता महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कुस्ती पटावर चमकत आहे.
वडिलांचे स्वप्न पुर्ण....
आपल्या वडीलांच्या, भावाच्या पाठीवर असलेले हमालीचे ओझे कमी व्हावे, घरातले दारिद्र हटावे यासाठी रक्ताचे पाणी करणारा सिकंदर अलीकडेच भारतीय लष्करात भरती झाला आहे. सैन्यदलाकडून खेळत तो अनेक मैदाने जिंकत आहे. आपला मुलगा मोठा मल्ल बनावा ही वडीलांची इच्छा त्याने पुर्ण केली आहे.
सिंकदर बक्षिसांनी बनला श्रीमंत....
आता पर्यंत देशभरात कुस्त्या लढून सिंकदरने बक्षिसांची लयलूट केली आहे. यामध्ये एक महिन्द्रा थार चारचाकी, एक जॉन डिअर ट्रक्टर, चार अल्टो कार, चोवीस बुलेट, सहा टिव्हीस, सहा सप्लेंडर तर तब्बल चाळीस चांदी गदा त्याने आपल्या नावावर केल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.