MS Dhoni Birthday : क्रिकेटला क्रिकेटपण देणाऱ्या माहीचं 'शिवधनुष्य' अजूनही शाबूत..

MS Dhoni Birthday
MS Dhoni Birthday ESAKAL
Updated on

MS Dhoni Birthday : इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या हंगामात फायनलमध्ये गुजरातच्या तोंडाशी आलेला घास महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने पळवत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. फायनलमध्ये शेवटच्या दोन चेंडूंवर अत्यंत प्रेशरमध्ये षटकार आणि चौकार मारत विजय खेचून आणणारा रविंद्र जडेजा विजयाचा खरा शिल्पकार ठरला. त्यानंतर जडेजाने धावत जाऊन धोनीला मारलेली मिठी आणि नेहमी शांत राहणाऱ्या धोनीने आपले अश्रू लपवत जडेजाला कवटाळून उचलून घेणे, हा आयपीएलच्या इतिहासातील एक अजरामर क्षण म्हणून नोंदला गेला.

MS Dhoni Birthday
MS Dhoni Birthday : जडेजाचा चौकार... धोनीचं डोळे मिटून घेणं अन् गंभीरला चपराक! अखेर 40 व्या वर्षी कॅप्टन्सीवरील मळभ दूर

खरं तर ह्या हंगामात मुख्य खेळाडूंना झालेल्या दुखापती, अननुभवी खेळाडू, गोलंदाजीचा साधारण दर्जा यामुळे कागदावर सीएसकेचा संघ फारच कमजोर वाटत होता. पण असे असताना विजेतेपदाइतकी मोठी मजल मारणे, हे नक्कीच कौतुकास्पद व तितकेच अविश्वसनीय आहे. कठीण काळ बलवान माणसे निर्माण करतो आणि बलवान माणसे सोपी वेळ निर्माण करतात.

ही गोष्ट धोनीसाठी वारंवार लागू होते. जेव्हा खेळ नाजूक परिस्थितीत येतो, तेव्हा पराजयाच्या कंपाने धोनी सारखे खेळाडू रणांगण सोडत नाहीत किंवा विजयाच्या हर्षोल्हासाने उन्मत्त होत नाहीत. परिस्थिती कोणतीही असो, ते आपला संयम कधीच ढळू देत नाही. हीच गोष्ट धोनीकडून शिकण्यासारखी आहे.

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी आजही त्याची लोकप्रियता अफाट आहे. या हंगामात मी स्वतः तीन राज्यात सामन्याच्या दिवशी ह्याचा अनुभव घेतला आहे. संपूर्ण भारतात टीव्ही, सोशल मिडियापासून ते स्टेडियममधील चाहत्यांपर्यंत धोनीची कमालीची क्रेझ दिसून आली. दिल्ली आणि चेन्नई यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी चाहत्यांनी धोनीला पाहण्यासाठी गर्दी केल्यामुळे दिल्लीत बराच वेळ चक्क रस्ताच जाम झाला होता.

MS Dhoni Birthday
MS Dhoni Birthday : कूल धोनी ज्यावेळी रोमँटिक होतो...

धोनी त्याच्या क्रिकेटिंग कारकिर्दीच्या अंताला आलाय किंवा त्याने नुकताच खेळलेला आयपीएल फायनल सामना हा त्याचा अंतिम सामनाही असू शकतो. त्याची रनिंग करताना दिसणारी मर्यादित चपळाई, थकलेले किंवा जखमी पाय या गोष्टी या सीझनमध्ये प्रकर्षाने जाणवल्या. पण कारकिर्दीच्या या टप्प्यावर येऊनही त्याचा क्रिकेटिंग ब्रेन अजूनही शाबूत आणि तीक्ष्ण आहे.

ऑरेंज कॅप होल्डर शुभमन गिलची ०.१ सेकंदमध्ये केलेली स्टंपिंग पाहून यष्टींच्या मागचा धोनी आजही सर्वाधिक स्किलफुल आणि धोकादायक वाटतो. आज वय त्याच्या बाजूने नाही. सरावही नसल्यामुळे त्याच्या बॅटिंगमध्ये तो स्पार्क नक्कीच नाही. त्यामुळे त्याने फलंदाजीत आठव्या नंबरवर खेळायला येणे साहजिक आहे. पण असे असताना देखील या हंगामात शेवटच्या ओव्हर्समध्ये त्याच्या बॅटमधून निघणारे षटकार थांबले नाहीत.

विशेषतः दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याची इनिंग निर्णायक ठरली. त्याच्या कॅमिओमुळे संघाला मोमेंटम मिळाले व एक चांगली धावसंख्या धावफलकावर लागल्यामुळे त्यांना सामना जिंकता आला. २००८ सालच्या आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून ते आज २०२३ ला वयाच्या ४२ व्या वर्षापर्यंत तो चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करतोय, हेच मुळात थक्क करणारे आहे.

MS Dhoni Birthday
Pakistan Cricketer : हे इतके नालायक आहेत हे की... पुराच्या पाण्यात खेळ करणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूवर नेटकरी जाम भडकले

कोविडचे सावट भारतीय क्रिकेटवर आल्यावर धोनीने मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे सचिनला शेवटच्या सामन्यात जी मानवंदना मिळाली, ती धोनीला मिळाली नव्हती. धोनीचा हा शेवटचा आयपीएल सीझन असेल, अशी सर्वांनी मनाची तयारी केली होती. हंस पक्षी शेवटचं गाणं तोंड न उघडता गातो.

त्यावेळी जे सूर उमटतात, ते अतुलनीय असतात. म्हणूनच इंग्लिशमध्ये शेवटच्या कामगिरीला ‘स्वॅन साँग’ म्हणतात. "धोनीचं स्वॅन साँग हे सचिनसारखंच गोड असावं. धोनीने जगातील सर्वात जास्त प्रेक्षकसंख्या असलेल्या स्टेडियमवर जगातील सर्वात मोठ्या टी-२० मालिकेचे जेतेपद पटकावूनच आपल्या कारकिर्दीचा शेवट करावा व आपण याची देही याची डोळा ते क्षण अनुभवावे", असे त्याच्या जगभरातील चाहत्यांना वाटत होते.

म्हणूनच गुजरातच्या अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यातही निम्म्याहून अधिक मैदान पिवळ्या जर्सीत असणे, ही भारताच्या प्रत्येक भागातून आलेल्या चाहत्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूला दिलेल्या प्रेमाची पावती होती. कारकिर्दीच्या या टप्प्यावर धोनीला सर्वत्र मिळणारा मान, पाठिंबा आणि प्रेम हे केवळ त्याच्या महान खेळाचे द्योतक आहे.

धोनी हा एक ब्रँड आहे. "धोनी म्हणजे सीएसके आणि सीएसके म्हणजे धोनी", हे एक समीकरण बनलंय. कारण धोनीचा करिष्माच सीएसकेला लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेलाय. पण क्रिकेट या सांघिक खेळासाठी ही थोडी विरोधाभास असलेली गोष्ट आहे. कारण धोनीला वगळून सीएसके संघाची कल्पनाही करवत नाही.

MS Dhoni Birthday
हॉटेल ते एरोस्पेसमध्ये गुंतवणुक करणाऱ्या धोनीची संपत्ती किती?

धोनीचे हे स्टारडम आणि फँडम एका रात्रीत बनलेले नाही. त्याच्या कर्तृत्वाने ओरडून सांगितलं की, क्रिकेट हा फक्त मोठ्या शहरातील मुलांचा खेळ नाही. रांचीसारख्या एका छोट्या शहरातील पंप ऑपरेटरचा मुलगाही मोठी स्वप्नं पाहू शकतो व पुढे जाऊन देशाचे नेतृत्व करू शकतो, हे त्याने आपल्या कामगिरीतून जगाला दाखवून दिले. शालेय जीवनात अपघाताने क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यावर किशोरवयीन काळापर्यंत अगदी तंत्रशुद्ध खेळाडू प्रमाणे त्याची कधीच जडणघडण झाली नाही.

तो अगदी रॉ स्टाईलमध्ये फटके मारायचा. छोट्या शहरातील आधुनिक सुविधांचा अभाव, टर्फवर खेळायला न मिळणे, महागडे आधुनिक तंत्रज्ञा व कोचेस यांचा अभाव असतो. त्यामुळे टेनिस बॉलवर क्रिकेट खेळणे हाच एक पर्याय असल्यामुळे छोट्या शहरातील खेळाडूंची जडणघडण ही मुंबई, दिल्ली, बेंगलुरु, कोलकाता, चेन्नई इ. मोठ्या व आधुनिक ठिकाणी घडणाऱ्या खेळाडूंप्रमाणे होत नाही.

धोनीचा शालेय कोच केशव बॅनर्जी यांनी त्याची क्षमता ओळखून त्याला टेक्स्टबुक क्रिकेटऐवजी आपला स्वाभाविक खेळ खेळायला सांगितले. क्रिकेटच्या पुस्तकातील कोणतेही परंपरागत शॉट्स शिक म्हणून अट्टहास केला नाही. हा खेळाडू या कोचनेच घडवला कारण त्याने त्याला परंपरेच्या चौकटीत कधी अडकू दिले नाही.

धोनी आपल्या प्रवासात रोज स्वप्नं तुटतांना किंवा इतरांनी ते तोडतांना पाहत होता. पण सर्व अडथळ्यांवर मात करत त्याने भारतीय संघात मिळवले. त्यामागची जिद्द, मेहनत, संयम व नेव्हर से डाय ॲटीट्यूड हे विस्मयकारक व प्रेरणादायी आहे.

तत्कालीन कोच ग्रेग चॅपेल त्याच्याबद्दल म्हणाले की याची विचार करायची पद्धत सामान्य माणसाच्या समजण्यापलीकडे होती. २००५ साली जयपूरला श्रीलंकेविरुद्ध भारत २९९ धावांचा पाठलग करण्याआधी तो मला म्हणाला होता, "मला फक्त भारताचे पहिले १३ चेंडू बघू द्या, मी हा सामना जिंकवून देईल."

भारताच्या इनिंग्समध्ये फक्त पाचव्या चेंडूवर सचिन बाद झाल्यावर त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन एकहाती हा सामना जिंकवून दिला होता. त्याच्या अविस्मरणीय नाबाद १८३ धावांच्या खेळीमुळे त्याला संपूर्ण भारताने डोक्यावर घेतले होते.

चॅम्पियन्स ट्रॉफी २००६ मध्ये इंग्लंडविरुद्ध फक्त १२६ धावा चेस करत असताना त्याने मोठा फटका मारायच्या नादात आपली विकेट सोडली. व फॉर्मशी झगडत असलेल्या सुरेश रैनाला एक्सपोज केले, जो खातेही न उघडता तंबूत परतला.

भारत शेवटी तो सामना जिंकला खरा, पण सामना संपवून येण्याचे महत्व काय असते हे त्याने तेव्हा जाणले. हाच भारतीय क्रिकेट मधील सर्वात मोठा संक्रमणाचा काळ होता. भारतीय क्रिकेटमध्ये एक ॲग्रेसिव्ह युवा फलंदाज म्हणून ओळखला जाणारा तो अचानक भारतीय संघाचा मोस्ट डिपेंडेबल अँड रिलाएबल फिनिशर बनला. त्याने स्वतः शेवटपर्यंत किल्ला लढवून जिंकवून दिलेल्या सामन्यांची यादी आजही वाढत आहे.

MS Dhoni Birthday
Tamim Iqbal Retires : वर्ल्ड कपपूर्वी बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठा भूकंप! कर्णधाराला 'रडत' घ्यावी लागली निवृत्ती

२००७ च्या विश्वचषकातून भारतीय संघ पहिल्याच फेरीत अपमानास्पद पराभवांनंतर बाहेर पडल्यावर याच्या घरावर दगडफेक झाली. याला जमावाचा रोष पाहून घरी जाता आले नाही. भारतीय क्रिकेटसाठी हा कठीण काळ होता. याच वर्षी होणाऱ्या पहिल्या टी-२० विश्वचषकासाठी धोनीच्या गळ्यात कर्णधारपदाची माळा घालण्यात आली.

तेव्हा भारतीय रसिकांनी कपाळावर मारलेला हात त्या विश्वचषकाच्या जोगिंदर सिंगने टाकलेल्या शेवटच्या चेंडूनंतर त्यांना धोनीच्या पाठीवर कौतुकाने फिरवावासा वाटला. यानंतर त्याच्या आगमनावेळी त्याच्या घराजवळ प्रशंसकांची एवढी गर्दी झाली की त्याला घरी न जाता हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागला.

भारतातील प्रेक्षकांच्या या एकाच व्यक्तीबद्दल परिस्थितीनुसार टोकाच्या प्रतिक्रिया होत्या. तेव्हापासून त्याने आयुष्यात मनाशी एक पक्की गाठ बांधली की अपयशाने खचून जायचे नाही व यशाची हवा किंवा लोकांची प्रशंसा कधीच डोक्यात जाऊ द्यायची नाही.

धोनीची खेळाडू म्हणून कसोटी क्रिकेट कारकीर्द त्याच्या नावाला साजेशी नव्हती. पण कर्णधार धोनीने भारतीय संघाला कसोटी क्रिकेटच्या आयसीसी क्रमवारीत सर्वोच्च स्थानावर नेऊन बसवलं, हे विसरता येणार नाही. पुढे जाऊन भारतीय संघाने त्याच्या नेतृत्वात २०११ साली विश्वचषक व २०१३ साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले.

क्रिकेट इतिहासात सर्व आयसीसी ट्रॉफीज जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. सुनिल गावसकर म्हणतात की जेव्हा मी आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असेल, तेव्हा धोनीने २०११ विश्वचषकात फायनलमध्ये मारलेला विजयी षटकार पाहण्याची माझी शेवटची इच्छा असेल.

त्याच्या चेन्नई सुपर किंग्स या संघाचे नेतृत्व करताना त्याने पाच वेळा आयपीएल व दोन वेळा चॅम्पियन्स लीग ट्रॉफीज जिंकल्या. तो निर्विवादपणे क्रिकेटच्या इतिहासातील महान कर्णधार आहे. फक्त त्याच्या नेतृत्वाच्या कालखंडात लक्ष्मण, द्रविड व सेहवाग ही मंडळी फार स्वेच्छेने निवृत्त झाली नाहीत, असे कुठेतरी वाटते.

त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटी २०१९ च्या विश्वचषकात तो फलंदाज म्हणून पूर्वीचा धोनी वाटला नव्हता. त्याचे हुकमी फटके त्याच्या शरीराचे हुकूम मानत नव्हते. त्याच्या छातीवरचा ‘मॅचविनर’ हा बिल्ला कुठेतरी हरवत होता. तेव्हाच त्याचं उत्तरायण सुरू झालं होतं. पण त्याला कुठे थांबायचे हे चांगले माहीत आहे.

त्यामुळे त्याने कोविडमध्ये गाजावाजा न करता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून शांतपणे निवृत्ती स्वीकारली. रांचीचा एक सामान्य तिकीट चेकर ते जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करणारा ट्रॉफी कलेक्टर, हा त्याचा अविश्वसनीय वाटणारा प्रवास थांबला.

MS Dhoni Birthday
1983 World Cup : भारत नशीबानं जिंकला; संघात प्रभावी खेळाडूच नव्हते... विंडीजच्या माजी खेळाडूचे खळबळजनक वक्तव्य

धोनीनंतर आपण आजही तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या यष्टिरक्षक फलंदाजाच्या शोधात आहोत. कोणी स्टंपिंग चान्स मिस केल्यावर, डीआरएसचा चुकीचा कॉल घेतल्यावर "अरे यार, धोनी हवा होता" अशी आरोळी अधूनमधून ऐकायला येतेच.

यापुढे आयपीएलमध्ये धोनीने फक्त मैदानावर उभी राहायची जरी ग्वाही दिली, तरी तो स्टंप्समागून काहीतरी चमत्कार घडवेल, असे त्याच्या चाहत्यांना वाटते. तो संघासोबत राहिला तर संघाची ब्रँड व्हॅल्यू टिकून राहील, हेदेखील संघ मालकांना चांगलेच माहिती आहे. पण त्याच्या भविष्याबद्दल आपण फक्त कुजबुज करू शकतो, काही टीकाकार टीका करू शकतात, चाहते विनंती करू शकतात;

पण "मी आयपीएलच्या पुढच्या स्पर्धेसाठी खेळायला तयार आहे" असं त्याने म्हटल्यावर त्याला कुणी टाळू शकत नाही. कारण तो इच्छामरणी भीष्माचार्य आहे. त्याने कधी निवृत्त व्हायचे, हे तोच ठरवणार. कोणतीही सीरीज जिंकल्यावर आपल्या हातातली ट्रॉफी लगेच नवोदित खेळाडूच्या हातात सोपवून कडेला जाऊन उभा राहणारा तो क्रिकेटपासूनही हळूच कायमचा कडेला होईल.

भारतात गावसकर, कपिल, सचिन, गांगुली, धोनी, विराट व रोहित या सर्वांचा चाहता वर्ग आहे. आयपीएल सारखी स्पर्धा आली किंवा क्रिकेटच्या इतिहासावर चर्चा झाली की त्या खेळाडूंच्या खेळाबद्दल प्रशंसा, टीका होणे, मतमतांतरे असणे साहजिकच आले. पण त्यामुळे क्रिकेटमधील या महापुरुषांची महानता तसूभरही कमी होत नाही. अलीकडच्या काळात भारतीय क्रिकेटला या महान खेळाडूंची मांदियाळी लाभली, हेच किती सुखकारक आहे.

आज धोनीचा ४२ वा जन्मदिन. त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

उद्या आयपीएल मध्ये हा ४२ वर्षीय धोनी खेळायला मैदानात उतरलाच आणि नियतीने त्याच्या भात्यातील कितीही 'बाण' (जखमी खेळाडू) पळवले, तरी 'क्रिकेटिंग ब्रेन' नावाचे शिवधनुष्य मात्र त्याच्याकडे शाबूत आहे, हे विसरू नका.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()