पणजी - महाराष्ट्राचा ऑलिंपिकवीर वीरधवल खाडे व त्याची पत्नी ऋजुता यांनी येथे अनुक्रमे पुरुष व महिला विभागात वेगवान जलतरणपटूचा मान मिळवताना आज (ता. ३१) देदीप्यमान कामगिरी केली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील जलतरण या क्रीडा प्रकारात तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन ब्राँझ अशी एकूण सहा पदकांची कमाई केली.
मिहीर आम्ब्रेने ५० मीटर फ्री स्टाईल शर्यतीत ब्राँझपदक जिंकले. पलक जोशीने आजारपणावर मात करीत २०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक पटकावले; तर ऋषभ दासने या शर्यतीत रौप्यपदकावर मोहोर उमटवली. याचप्रमाणे तुषार गीतेने प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये ब्राँझपदकाची माळ गळ्यात घातली.
वीरधवलने ५० मीटर फ्रीस्टाईल शर्यत २२.८२ सेकंद अशा विक्रमी वेळेत पूर्ण करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. या वेळी त्याने २०१५ मध्ये नोंदवलेला स्पर्धा विक्रम येथे मोडला. त्याचा सहकारी मिहीरने याच शर्यतीत ब्राँझपदक मिळवताना २२.९९ सेकंद अशी वेळ नोंदविली.
वीरधवलच्या शर्यतीपाठोपाठ त्याची पत्नी ऋजुताने ५० मीटर फ्रीस्टाईल शर्यत २२.४२ सेकंदांत पार केली आणि वेगवान जलतरणपटू हा किताब मिळवला. ही स्पर्धा जिंकताना तिने अवंतिका चव्हाणने राजकोट येथे गतवर्षी नोंदविलेला २६.५३ सेकंद हा स्पर्धा विक्रम मोडला. २०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत ऋषभ दास याने रौप्यपदक जिंकले. त्याने हे अंतर दोन मिनिटे ४.८० सेकंदात पार केले.
वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्राचे धडाकेबाज विजय
महाराष्ट्राच्या संघांनी वॉटरपोलोमध्ये पुरुष व महिला या दोन्ही विभागात एकतर्फी विजय नोंदवत आगेकूच कायम राखली. पुरुषांमध्ये महाराष्ट्राने मणिपूरचा २८-३ असा धुव्वा उडवला. महाराष्ट्राचा हा पहिला सामना होता. महिलांमध्ये महाराष्ट्राने आसाम संघाचा २५-१ असा दारुण पराभव केला. महाराष्ट्राचा हा सलग दुसरा विजय आहे.
आजारपणावर मात करीत पलकची सोनेरी कामगिरी
महाराष्ट्राच्याच पलक जोशीने मिळवलेले यश अतिशय कौतुकास्पद आहे. तिने २०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यत दोन मिनिटे २२.१२ सेकंदात पार करून सुवर्णपदक जिंकले. तिने प्राथमिक फेरीतून आठव्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली होती. मात्र जिद्दीच्या जोरावर तिने शेवटच्या १०० मीटर्समध्ये आघाडी घेत सोनेरी यश खेचून आणले. दोन दिवसांपूर्वी अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार करावे लागले होते.
प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये तुषार गीतेला ब्राँझ
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तुषार गीतेने प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये ब्राँझपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शानदार सलामी दिली. या स्पर्धेमध्ये त्याचे हे पहिलेच पदक आहे. त्याने २४९.९० गुण नोंदवले. तो मुंबई येथील खेळाडू असून रेल्वे संघाकडून त्याने आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.