Neeraj Chopra Competes with hand Injury: भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा शनिवारी ब्रुसेलमध्ये झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये भालाफेकीच्या प्रकारात उतरला होता. या स्पर्धेत त्याला सलग दुसऱ्यांदा दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
विशेष म्हणजे अवघ्या एका सेंटीमीटरने त्याचे विजेतेपद हुकले. दरम्यान, या स्पर्धेनंतर नीरजने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली की त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर आहे, मात्र असं असतानाही तो स्पर्धेत उतरला होता.
खरंतर गेल्या काही महिन्यांपासून नीरज दुखापतींचा सामना करत आहे. मांडीच्या जवळ (Groin Injury) असलेल्या दुखापतीवर वैद्यकिय सल्ला घेण्यासाठी तो पॅरिस ऑलिम्पिकनंतर जर्मनीला देखील गेला होता. पण त्यानंतरही त्याने लॉझान डायमंड लीग खेळली होती.