Neeraj Chopra brand valuation : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने काल मध्यरात्री लोझान डायमंड लीगमध्ये जबरदस्त कमबॅक करून दुसरे स्थान निश्चित केले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजने रौप्यपदक जिंकले आणि सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक गटात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजने भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले होते. पॅरिसमधील रौप्यपदकाने नीरजच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
भारतीय सैन्यदलात सुभेदारपदावर असलेल्या नीरजच्या ब्रँड व्हॅल्यूत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने हे वृत्त दिले आहे. कंपनी आणि जाहिरात क्षेत्रात नीरजची लोकप्रियता वाढल्याने त्याची ब्रँड व्हॅल्यू ४० मिलियन डॉलर म्हणजेच ३३० कोटी झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी ही व्हॅल्यू २६.६ मिलियन डॉलर होती. नीरजने मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याला ब्रँड व्हॅल्यूत मागे टाकले आहे.
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिचे सुवर्ण स्वप्न भंगले आणि तिची रौप्यपदकाची याचिका फेटाळून लावली. तरीही तिच्या ब्रँड व्हॅल्यूत वाढ झाल्याचे ET ने म्हटले आहे. ET च्या वृत्तानुसार फोगाटने तिच्या endorsement मध्ये प्रतिवर्ष २५ लाखांहून १ कोटी इतकी वाढ केली आहे. नेमबाज मनू भाकरने पॅरिसमध्ये दोन कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आणि एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.