पुणे : क्विंटन डी कॉक आणि व्हॅन डर ड्युसेन यांच्या तडाखेबंद शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दिलेले साडेतीनशेहून अधिक धावांचे आव्हान न्यूझीलंडला आज पेलवले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या अचूक माऱ्यापुढे त्यांचा डाव ३५.३ षटकांत १६७ धावांत गडगडला आणि त्यांना १९० धावांनी पराभूत व्हावे लागले.
पुण्यात गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेला आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. आजच्या विजयामुळे आफ्रिकेने गुणतक्त्यात सरस धावगतीच्या आधारे पहिला क्रमांक मिळविला आहे. न्यूझीलंडची सलग तिसऱ्या पराभवामुळे चौथ्या स्थानावर घसरण झाली.
फलंदाजीला साथ देणारी खेळपट्टी असूनही न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मैदानावरील गेल्या दोन सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकला होता. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना चार बाद ३५७ अशी या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या उभारली.
त्याला उत्तर देताना न्यूझीलंडचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. विल यंग, डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या तिघांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. अखेर त्यांचा डाव १६७ धावांत संपुष्टात आला.
दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज मार्को यान्सेनने तीन आणि केशव महाराजने चार बळी मिळवून संघाचा विजय साकारला. विजय मिळविण्यासाठी चांगली भागीदारी करणे न्यूझीलंडने केवळ १०० धावांत सहा गडी गमावले होते. शेवटी ग्लेन फिलिप्सने फटकेबाजी करत ६० धावा केल्या, परंतु, तोपर्यंत सामना हातातून गेलेला होता.
डी कॉक आणि व्हॅन डर ड्युसेन यांनी सावध खेळ करत संघाचा धावफलक हलता ठेवला. या दोघांनी २०.१ षटकात संघाच्या १०० धावा फलकावर लावल्या. डी कॉकने या स्पर्धेतील चौथे शतक करताना दक्षिण आफ्रिकेकडून एकाच विश्वकरंडकामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याने केला.
डी कॉक आणि ड्युसेन यांनी १८९ चेंडूंत २०० धावांची भागीदारी करून संघाला चांगल्या स्थितीत पोहोचविले. ड्युसेनने आक्रमक खेळ करत स्वतःचे या स्पर्धेतील दुसरे शतक (१३३) साजरे केले.
पुण्यातील मैदानावरील सर्वाधिक धावा
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील मैदानावरील आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या ३५६ होती. इंग्लंडविरुद्ध २०१७ मध्ये झालेल्या सामन्यात ३५० धावसंख्येचा पाठलाग करून विजय मिळवताना भारताने ती केली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने हा विक्रम मोडला. त्यांनी ३५७ धावा केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.