Novak Djokovic US Open : सर्बियाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोविच याने मंगळवारी पहाटे अमेरिकन ओपन या प्रतिष्ठेच्या टेनिस ग्रँडस्लॅममधील पुरुषांच्या एकेरीत विजयी सलामी दिली. जोकोविच याने फ्रान्सच्या ॲलेक्झँड्रे म्युलर याच्यावर सरळ तीन सेटमध्ये (६-०, ६-२, ६-३) विजय मिळवत पुढल्या फेरीत प्रवेश केला. आता एटीपी क्रमवारीत त्याचे पहिले स्थानही निश्चित झाले आहे; मात्र एटीपी क्रमवारी अद्याप अपडेट करण्यात आलेली नाही.
अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅमचा सोमवारी पहिला दिवस असल्यामुळे उद्घाटनीय सोहळा रंगला; अन् त्यामुळे जोकोविच - म्युलर यांच्यामधील लढत विलंबाने सुरू झाली; मात्र जोकोविचने अवघ्या २३ मिनिटांमध्ये पहिला सेट ६-० असा खिशात घातला. त्यानंतर दुसरा सेट ६-२ व तिसरा सेट ६-३ असा जिंकत जोकोविचने अगदी सहज यश मिळवले. जोकोविचने एक तास व ३५ मिनिटांमध्ये विजयाला गवसणी घातली.
त्सित्सिपासची आगेकूच
ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपास यानेही पहिल्या फेरीत सहज विजय साकारत पुढल्या फेरीत आगेकूच केली. त्याने पुरुषांच्या एकेरीतील लढतीत कॅनडाच्या मिलॉस राओनिच याच्यावर तीन सेटमध्ये मात केली. स्टेफानोस याने ६-२, ६-३, ६-४ असा विजय मिळवला. ग्रीसच्या खेळाडूने एक तास व ५६ मिनिटांमध्ये विजयावर हक्क सांगितला. पुरुषांच्या एकेरीच्या लढतीत अमेरिकेचा टेलर फ्रिटझ्, अमेरिकेचाच फ्रान्सेस टायफो आणि ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीम यांनीही पुढे पाऊल टाकले. फ्रिटझ् याने स्टीव जॉन्सनचे आव्हान ६-२, ६-१, ६-२ असे संपुष्टात आणले. फ्रान्सेसने लर्नर टिएन याला ६-२, ७-५, ६-१ असे नमवले. थिम याने कझाकस्तानच्या ॲलेक्झँडर बुबलिक याच्यावर ६-३, ६-२, ६-४ असा तीन सेटमध्ये विजय मिळवला.
स्विअतेक, गॉफ पुढच्या फेरीत
अव्वल मानांकित इगा स्विअतेक हिनेही अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅमच्या पहिल्या फेरीचा अडथळा सहज ओलांडला. स्विअतेक हिने रेबेका पीटरसन हिच्यावर ६-०, ६-१ अशी मात केली. सहावी मानांकित कोको गॉफ हिने लॉरा सिगमंड हिचा कडवा संघर्ष ३-६, ६-२, ६-४ असा तीन सेटमध्ये मोडून काढला. गॉफ हिने दोन तास व ५१ मिनिटांमध्ये प्रतिस्पर्ध्यावर विजय संपादन केला. या दोघींसह महिला एकेरी विभागात बिट्रीज हडाड मेय, व्हिक्टोरिया अझारेंका, बेलिंडा बेनसिच, कॅरोलिन वोजनियाकी यांनीही प्रतिस्पर्ध्यांना नमवत पुढे वाटचाल केली.
माझी आणि म्युलरमधील लढत उशिरा सुरू झाली; पण मला याबाबत आयोजकांचा राग आला नाही. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये खेळण्यासाठी उत्सुक होतो. पहिल्या दोन सेटमध्ये तर अव्वल दर्जाचा खेळ करता आला. यावरूनच मी किती आनंदी होतो, हे समजले असेल. आता हाच फॉर्म कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करीन.
- नोवाक जोकोविच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.