INDvsAUS : सिडनी : महिला क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ विश्वविजेपदासाठी आपली मोहीम उद्यापासून सुरू करत आहे आणि सलामीलाच त्यांच्यासमोर सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतालाही संभाव्य विजेत्या संघात स्थान दिले जात आहे.
या स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ अगोदरच ऑस्ट्रेलियात दाखल झालेला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा समावेश असलेल्या तिरंगी स्पर्धेत भारताने साखळीत या दोन्ही संघांना एकेकदा हरवले होते, पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून थोडक्यात पराभव झाला होता. या स्पर्धेतील अनुभव भारतीय संघासाठी बहुमोल ठरणार आहे.
उपकर्णधार स्मृती मानधना, 16 वर्षीय हरहुन्नरी शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रित कौर यांच्यावर भारताची फलंदाजी आधारलेली आहे. कोणतेही आव्हान स्वीकारण्याची क्षमता असलेल्या भारतीय संघात मधल्या फळीने सातत्य ठेवण्याची गरज आहे.
भारताची गोलंदाजीची मदार प्रामुख्याने फिरकीवर आहे. शिखा पांडे ही एकमेव अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याचे काम फिरकी गोलंदाजांनाच करावे लागणार आहे. नव्या चेंडूवर मी गोलंदाजी करणार असल्यामुळे सुरुवीताला ब्रेक थ्रु देण्यासाठी माझा प्रयत्न असेल, असे शिखा पांडेने सांगितले.
गेल्या दोन वर्षांत भारतीय संघामध्ये कमालीची प्रगती झालेली आहे. तंदुरुस्ती आणि दृष्टिकोन सक्षम झालेला आहे, असे प्रशिक्षक वूर्केरी रामन यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलिया फेव्हरिट : मिताली
उद्या (ता.२१) होणाऱ्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया फेव्हरिट असेल, पण भारतही दूर नाही, असे मत भारताची माजी कर्णधार मिताली राजने मांडले. भारताकडेही तेवढे सक्षम खेळाडू असल्यामुळे उद्याचा हा सामना भरपूर धावांचा आणि अटीतटीचा होईल, असे मिताली म्हणते.
दोन्ही संघांची फलंदाजी भक्कम असल्यामुळे कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकतो. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास ऑस्ट्रेलियाच्या बाजूने असल्यामुळे मी त्यांना पसंती देत असल्याचे मितालीने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.