Padma Awards 2021: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व करणारी राणी रामपाल हिला सोमवारी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. राणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टोकियो ऑलिम्पिक गेम्समध्ये चौथ्या स्थानावर राहिला. भारतीय महिला संघाची ऑलिम्पिकमधील आजपर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी राणीने भारतीय हॉकीमध्ये प्रवेश केला होता.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघ कांस्य पदकापासून वंचित राहिला. पण संघानं दाखवलेल्या जिद्द आणि चिकाटीनं भारतासह जगभरातील हॉकी प्रेमींची मनं जिंकली. संघाच्या या प्रदर्शनामागे संघाचे प्रशिक्षक आणि खेळाडूंचे योगदान तर महत्त्वाचं आहेच, पण संघाची कर्णधार राणी रामपालची भूमिकाही तितकीच महत्त्वाची होती. आज तिला दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राणीला काही दिवसांपूर्वी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारही मिळाला होता. सलग पराभवानंतरही राणीने खेळाडूंना खचू दिले नाही. याचा परिणाम म्हणून भारतीय संघ चौथ्या स्थानावर राहिला. ऑलिम्पिकमधील भारतीय महिला हॉकी संघाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
हॉकीच्या राणीचा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. गरीब आणि दुःखामुळे खचून जाणाऱ्या लोकांसाठी राणीचा प्रवास प्रेरणादायी ठरू शकतो. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या राणीसाठी हॉकी खेळण्याचा विचार करणही कठीण होते. घरच्या हलाकीच्या परिस्थितीत स्वप्नं पाहणही मुश्किल होते. तिचे वडील टांगा चालवायचे. दिवसाला जेमतेम 100 रुपये मिळायचे. आई लोकांच्या घरी कामं करायची. घरही मातीचे होते. पावसाळ्यात घरात पाणी भरायचे. त्यामुळे पाऊस पडू नये म्हणून राणीचे कुटुंबीय प्रार्थना करायचे. कारण जर पाऊस पडला तर त्यांना रात्र काढणे अवघड जात असेल.
राणी रामपाल अवघ्या 6 वर्षांची असताना तिला हॉकीची आवड निर्माण झाली. राणीच्या घरासमोर हॉकी अॅकॅडमी होती. शाळेत येताना मुलांना हॉकी खेळताना पाहिल्यावर तिलाही हॉकी खेळायची इच्छा झाली. मग काय, तिनं घरच्यांची समजवायला सुरुवात केली. तिच्या हट्टापुढे घरच्यांनीही नमतं घेतलं आणि हॉकीच्या राणीचा प्रवास सुरु झाला. प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अशक्यप्राय गोष्ट साध्य करता येते हेच तिने दाखवून दिले आहे.
जेव्हा राणी शाहबाद हॉकी अॅकॅडमीमध्ये प्रवेशासाठी पोहोचली तेव्हा तिची उंची पाहून प्रशिक्षक बलदेव सिंग म्हणाले की, तुला आरोग्यावर लक्ष द्यायची गरज आहे. पण राणी आपल्या निर्णयावर ठाम होती. प्रशिक्षकही आपल्या भुमिकेवर कायम होते. राणीनेही हार मानली नाही. ती दररोज अॅकॅडमीच्या फेऱ्या मारायची. वर्षभराचा संघर्ष आणि तपश्चर्येनंतर प्रशिक्षकांचं हृदयही द्रवलं आणि राणीला अॅकॅडमीत प्रवेश मिळाला .राणीचा खेळ पाहून प्रशिक्षकही दंग झाले. पण ही तर खडतर प्रवासाची सुरुवात होती. कारण राणीच्या घरची आर्थिक परिस्थिती कोणापासून लपलेली नव्हती. हॉकी कीट, आहार या सगळ्यांची व्यवस्था तिला करावी लागली.
प्रशिक्षणासाठी येण्यासाठी प्रशिक्षकाने राणीला दररोज अर्धा लिटर दूध आणण्यास सांगितले होते. पण त्याचे कुटुंब 200 मिली पेक्षा जास्त दुधाची व्यवस्था करू शकत होते. पण राणीला काहीही करुन हॉकी खेळायची होती. त्यामुळे ती दूधात पाणी मिसळून पित असे, जेणेकरून तिच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया थांबणार नाही. या जिद्दीच्या जोरावर ती एक-एक करत यश मिळवत गेली. यानंतर राणीने मागे वळून कधीच पाहिले नाही.
वयाच्या 15 व्या वर्षी राणी भारतीय हॉकी संघात सामील झाली. 2009 मध्ये राणीला 'द यंगेस्ट प्लेयर' म्हणून घोषित करण्यात आले. 2019 मध्ये राणीला ‘वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर’चा किताबही मिळाला होता. एखाद्या हॉकीपटूला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.