चेन्नई : नेदरलँड्स व श्रीलंका यांच्याविरुद्ध विजय साकारत दमदार सुरुवात करणाऱ्या पाक क्रिकेट संघाला एकदिवसीय विश्वकरंडकातील पुढील तीन लढतींमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.
यामुळे त्यांच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशांना सुरुंग लागला. आता त्यांच्यासमोर उद्या (ता. २७) चेन्नईत होणाऱ्या लढतीत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. पाकसाठी पुढील चारही लढती ‘करो या मरो’ अशाच असणार आहेत.
भारतातील विश्वकरंडक पाकिस्तानसाठी सुरुवातीपासूनच अडचणींचा ठरला आहे. अमुक या ठिकाणी खेळणार नाही, असा सूर लावल्यानंतर खेळाडूंच्या व्हिसालाही विलंब झाला. यानंतर पहिल्या दोन लढतींत छान खेळ केल्यानंतर पाकिस्तानी संघाला पुढील तीन लढतींमध्ये निराशेला सामोरे जावे लागले.
पाकिस्तानी संघातील अंतर्गत भांडणे प्रसारमाध्यमांसमोर आली. कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मोहम्मद रिझवान वगळता इतर फलंदाजांनाच्या बॅटमधून धावाच निघाल्या नाहीत.
सुमार गोलंदाजी
नसीम शहाच्या अनुपस्थितीत पाकिस्तानी संघाचा गोलंदाजी विभागातही पाय खोलात गेला आहे. शाहीन आफ्रिदीला सूर गवसला नाही. सुरुवातीच्या षटकांमध्ये त्याला प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आली नाही. हॅरिस रौफच्या एकदिवसीय क्रिकेटमधील गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हसन अलीचा अनुभव येथे कामाला येत नाही. शादाब खान हा फिरकी गोलंदाज पाकचा उपकर्णधारही आहे, पण भारतातील पर्यायी खेळाडूंच्या तुलनेचीही गोलंदाजी त्याच्याकडून झालेली नाही. मयांक मार्कंडे, राहुल चहर व सुयश शर्मा हे आयपीएलमध्ये चमक दाखवतात, पण त्यांना भारताच्या संघात संधी मिळत नाही. शादाबकडून त्यांच्यासारखीही गोलंदाजी झालेली नाही.
फलंदाज सुसाट
दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ फॉर्ममध्ये आहे. क्विंटॉन डी कॉक (३ शतकांसह ४०७ धावा), एडन मार्करम (एक शतक व दोन अर्धशतकांसह २६५ धावा), हेनरिच क्लासेन (एक शतक व अर्धशतकासह २८८ धावा),
वॅन डर ड्युसेन (एक शतक व एक अर्धशतकासह १९९ धावा) व डेव्हिड मिलर (१३८ धावा) यांच्याकडून धावाच धावा निघत आहेत. तसेच मार्को यान्सेन (१२३ धावा व १० विकेट) याची अष्टपैलू कामगिरी वाखाणण्याजोगी ठरली आहे. कागिसो रबाडा, गेराल्ड कोएत्झी या वेगवान गोलंदाजांकडून छान कामगिरी होत आहे.
दृष्टिक्षेपात
1 पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आतापर्यंत ८२ लढती झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने ५१ लढतींमध्ये विजय मिळवला असून ३० लढतींमध्ये पाकिस्तानने बाजी मारली आहे.
2 पाकिस्तानने पाच सामन्यांमधून २४ षटकार व १३६ चौकार मारले आहेत. दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांमधून ५९ षटकार व १५५ चौकारांची बरसात केली आहे.
3 क्विंटॉन डी कॉक, हेनरिच क्लासेन, एडन मार्करम, मार्को यान्सेन व डेव्हिड मिलर या दक्षिण आफ्रिकन फलंदाजांचा स्ट्राईक रेट १०० च्या वर आहे. सौद शकील व इफ्तिकार अहमद या दोनच पाकच्या खेळाडूंचा स्ट्राईक रेट १०० च्या वर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.