पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत शनिवारी भारताच्या खात्यात आणखी एक पदक निश्चित झाले आहे. महाराष्ट्राच्या सुकांत कदमने पुरुष एकेरी SL4 गटाच्या उपांत्य फेरीत धडक देताना भारताचे पाचवे पदक पक्के केला. पॅरा बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे पहिले पदक निश्चित झाले आहे. सुकांतने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत थायलंडच्या सिर्पोंग टीमॅरोमचा सरळ गेममध्ये २१-१२, २१-१२ असा पराभव केला.
सुकांतने २०२४च्या जागतिक आणि २०२३च्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. वयाच्या १० व्या वर्षी सुकांत कदमला क्रिकेटच्या मैदानावर अपघात झाला. गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. जवळपास एक दशक तो खेळापासून दूर राहिला. २०१२ मध्ये सायना नेहवालने ऑलिम्पिक पदक जिंकल्याचे पाहून तो प्रेरित झाला आणि पॅरा बॅडमिंटनपटू बनला.
नेमबाज अवनी लेखराने १० मीटर एअर रायफल स्टॅन्डिंग SH1 प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. हे तिचं पॅरालिम्पिकमधील दुसरं सुवर्णपदक ठरलं होतं. तिने टोकियो पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय तिच्याच क्रीडा प्रकारात मोना अगरवाल हिनेही कांस्य पदकाला गवसणी घातली.
पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल SH1 प्रकारात मनीष नरवालने रौप्य पदक पटकावलं. महिलांच्या T35 १०० मीटर प्रकारात प्रीती पालने कांस्य पदक जिंकले. ती ऍथलेटिक्सच्या ट्रॅक प्रकारात पदक जिंकणारी भारताची पहिलीच खेळाडू ठरली.