बाकू (अझरबैजान) - भारताचा १८ वर्षीय युवा आर. प्रग्नानंद याने सोमवारी अमेरिकेचा अनुभवी खेळाडू फॅबियानो कॅरुआना याला पराभूत करीत बुद्धिबळ विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारा प्रग्नानंद हा भारताचा दुसराच खेळाडू ठरला. याआधी विश्वनाथन आनंद याने ही किमया साधली होती. प्रग्नानंदच्या ऐतिहासिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर रशियाचे माजी जग्गजेते गॅरी कॅस्पारोव यांनीही त्याच्या खेळाचे तोंडभरून कौतुक केले आहे. प्रग्नानंदच्या पाठी त्याच्या आईची ताकद असल्याची स्तुती कास्पारोव यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.
कास्पारोव यांनी समाज माध्यमावर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, प्रत्येक स्पर्धेदरम्यान प्रग्नानंदजवळ मातृशक्तीची ताकद असते.
आईच्या आर्शीवादाने एक वेगळी ऊर्जा मिळते. लढण्याची प्रेरणा मिळते. प्रग्नानंदसोबत सध्या तेच घडत आहे. भारताच्या या खेळाडूचे मनापासून अभिनंदन, अशा शब्दांत कास्पारोव यांनी प्रग्नानंद याचे कौतुक केले.
टीव्हीपासून दूर अन् बुद्धिबळाची आवड
प्रग्नानंदचे वडील रमेशबाबू याप्रसंगी म्हणाले, माझी मुलगी वैशाली हिला टीव्ही बघण्याची सवय लागली होती. टीव्हीपासून दूर करण्यासाठी बुद्धिबळ आणून दिले, पण वैशाली व प्रग्नानंद या दोघांनाही या खेळाची गोडी लागू लागली.
त्यानंतर दोघांनीही या खेळामध्येच पुढे जाण्याचा निर्णय घेतला. दोघांचे बुद्धिबळ खेळावरील प्रेम पाहून आनंद वाटतो, असे रमेशबाबू आवर्जून म्हणाले.
यशाचे श्रेय आईला - रमेशबाबू
प्रग्नानंदने विश्वकरंडकाची अंतिम फेरी गाठत देदीप्यमान कामगिरी केली. प्रग्नानंदच्या या यशाचे श्रेय त्याची आई नागालक्ष्मी हिला जाते. स्पर्धेदरम्यान आई त्याच्यासोबत असते. ती वैशाली व प्रग्नानंद दोघांचीही काळजी घेते.
दररोज मी प्रग्नानंद व नागालक्ष्मी यांच्यासोबत बोलत होतो, पण कॅरुआनाविरुद्धच्या लढतीनंतर मला संवाद साधता आला नाही.
मी त्याला खेळाबाबत कोणताही सल्ला देत नाही. ते काम प्रशिक्षकांवर सोपवले आहे, पण आपल्या शरीराकडे व आहाराकडे लक्ष देण्यास सांगत असतो.
माझ्या लेकाने कॅरुआना, नाकामुरा यांसारख्या अनुभवी खेळाडूंना हरवल्याचा आनंद काही औरच आहे, अशा भावना रमेशबाबू यांच्याकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.
बचाव करण्याची क्षमता - एम. श्यामसुंदर
भारतीय बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक एम. श्यामसुंदर यांनीही प्रग्नानंदच्या खेळाचे कौतुक केले. ते म्हणाले, अनिश्चित खेळाच्या परिस्थितीतही बचाव करण्याचे कौशल्य प्रग्नानंदकडे आहे.
प्रग्नानंद वाईट परिस्थितीत असतानाही अनुभवी खेळाडूंविरुद्ध अव्वल दर्जाचा बचाव करू शकतो. तसेच प्रतिकूल परिस्थितीत सामना फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, अशा शब्दांत श्यामसुंदर यांनी त्याचे कौतुक केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.