Carrom Tournament : प्रशांत मोरे, काजलकुमारीला विजेतेपद ; राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत घवघवीत यश

मुंबईत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीत प्रशांत मोरे याने, तर महिला एकेरीत काजलकुमारी हिने अजिंक्यपदावर मोहर उमटवली. पुरुषांच्या एकेरीत महम्मद घुफ्रान याने, तर महिला एकेरीत श्रुती सोनावणे हिने तिसरा क्रमांक पटकावला.
Carrom Tournament
Carrom Tournamentsakal
Updated on

मुंबई : मुंबईत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीत प्रशांत मोरे याने, तर महिला एकेरीत काजलकुमारी हिने अजिंक्यपदावर मोहर उमटवली. पुरुषांच्या एकेरीत महम्मद घुफ्रान याने, तर महिला एकेरीत श्रुती सोनावणे हिने तिसरा क्रमांक पटकावला.

पुरुष एकेरीची अंतिम लढत आजी माजी विश्वविजेत्यांच्या रंगतदार लढतीने गाजली. चुरशीच्या लढतीत माजी विश्‍वविजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेने बाजी मारली. अंतिम सामन्यात त्याने मुंबई उपनगरच्या विद्यमान विश्‍वविजेत्या संदीप दिवेचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव केला. अंतिम फेरीत नाणेफेक जिंकलेल्या संदीपने पहिल्याच बोर्डात व्हाईट स्लॅम करून १२ गुणांची आघाडी घेतली; परंतु तरीही आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर सहाव्या बोर्ड अखेरीस प्रशांतने १९-१७ अशी दोन गुणांची आघाडी घेत उल्लेखनीय यश मिळवले. मात्र, सातव्या बोर्डात संदीपने पुन्हा व्हाईट स्लॅमची किमया करत २५-१९ अशा फरकाने पहिला सेट आपल्या खिशात घातला.

त्याचा फॉर्म पाहता तोच या स्पर्धेतील विजेता ठरणार ही प्रेक्षकांची अपेक्षा प्रशांतने फोल ठरवत दुसरा सेट २३-६ असा सहज जिंकून सामन्यात रंगात निर्माण केली. अंतिम फेरीतील तिसऱ्या सेटने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. दोनही खेळाडूंनी आपले सर्वस्व पणाला लावले. सातव्या बोर्ड संपल्यावर प्रशांतकडे १४-१३ अशी केवळ एका गुणांची आघाडी होती; परंतु ब्रेक त्याचा असल्याने प्रशांत हा सामना सहज जिंकेल, असे सर्वांना वाटत होते.

Carrom Tournament
IPL 2024 GT vs LSG : लखनौच्या विजयाची हॅट्‌ट्रिक ; गुजरातचा पराभव,यश ठाकूरचे पाच बळी

मात्र, संदीपने अगदी शेवटच्या बोर्डापर्यंत झुंज दिली. प्रशांतच्या हाताखालील असलेली आपली शेवटची सोंगटी संदीपने डबल टचचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु दुर्दैवी संदीपची सोंगटी थोडक्यात चुकली आणि प्रशांतने आपली शेवटची सोंगटी घेत बाजी मारली आणि अंतिम सेट १८-१३ असा जिंकला. अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या प्रशांत मोरेने उपांत्य लढतीत मुंबईच्या महम्मद घुफ्रानचे आव्हान १८-१४, १६-११ असे परतवून लावले. संदीपने मुंबईच्या पंकज पवारला २५-१२, २२-८ असे सहज पराभूत केले.

महिला एकेरीचा अंतिम सामना अगदी एकतर्फी झाला. मुंबईच्या काजलकुमारीने या लढतीत उदयोन्मुख समृद्धी घाडीगावकरचा २५-०, २५-१० असा पराभव केला. उपांत्य लढतीत काजलने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला २५-१२, १५-१८, २४-१० असे हरविले. समृद्धीने पालघरच्या श्रुती सोनावणेची कडवी झुंज २२-८, ९-२३, २१-८ अशी मोडून काढली.

घुफ्रान, श्रुतीचा तिसरा क्रमांक

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या पुरुषांच्या लढतीत महम्मद घुफ्रानने पंकज पवारला २१-११, २५-१५ असे नमवले. महिला एकेरीच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत श्रुती सोनावणेने प्राजक्ता नारायणकरवर रोमहर्षक लढतीत २५-१७, १५-२५, २५-११ असा विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.