Pro Kabaddi : प्रो-कबड्डीने घडवली नवी पिढी - अनुपम गोस्वामी

कोरोनामुळे काही काळासाठी दम घुटलेल्या प्रो कबड्डीने यंदाच्या मोसमापासून पुन्हा एकदा दणक्यात पुनरागमन केले.
Anupam Goswami
Anupam Goswamisakal
Updated on

कोरोनामुळे काही काळासाठी दम घुटलेल्या प्रो कबड्डीने यंदाच्या मोसमापासून पुन्हा एकदा दणक्यात पुनरागमन केले. १२ संघ पुन्हा एकदा आपापल्या घरच्या मैदानावर खेळले आणि कबड्डी एका बाजूला बहरत असताना दुसऱ्या बाजूला नवी पिढी प्रकाशझोतात आली. प्रदीप नरवाल, पवन शेरावतसारखे दिग्गज खेळाडू मागे पडले आणि आशू मलिक, अस्लम इनामदार, जयदीप सारख्या अनेक खेळाडूंनी यंदाची स्पर्धा गाजवली. १० व्या मोसमाच्या यशाबद्दल सांगत आहेत प्रो कबड्डी लीगचे आयुक्त अनुपम गोस्वामी.

नवे खेळाडू तयार करण्यासाठी आम्ही २०१६-१७ पासून रचना केली होती. आमचं नियोजन तेव्हापासून होतं.`न्यू टॅलेंट हंट` ही ती संकल्पना होती. असा प्रयोग देशातील शरीरवेधी खेळात झालेला नाही. त्यामुळे नवे खेळाडू आले. सहा - सात वर्षांनंतर आता आपण पाहतो तर त्या वेळचे हे नवे खेळाडू आता चमकत आहेत. त्यानंतर लीगसाठी नवे धोरण आम्ही तयार केले. आपली अकादमी तयार करावी अशी सूचना केली.

पुण्याने ही सूचना गांभीर्याने घेत नवे खेळाडू तयार करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. प्रो कबड्डीने अशा प्रकारे नवी पिढी तयार करण्याचे मोठे काम केले, हेच आमचे यश आहे. प्रत्येक तीन वर्षांनंतर एक नवे चॅलेंज पुढे येते. आणि हेच पुढे सुरू राहणार आहे आणि हे खेळाडू दर्जेदार असणार आहेत या पूर्वीचे खेळाडू थेट तयार झालेले होते.

काही वर्षांपूर्वी दिग्गज खेळाडूंना हे नवे खेळाडू टक्कर देत होते. पुण्याच्या अकादमीच्या योजना ठोस आहेत. पुण्याची फ्रँचाईसी तर आपल्या काही खेळाडूंना नोकरीसाठीही प्रयत्न करत आहेत. त्यांचे खेळाडू केवळ प्रो कबड्डीच्या मोसमासाठीच नसतात.

ज्या फ्रँचाईसकडे अनेक खेळांच्या संघांची मालकी आहे, ते फ्रँचाईस आणि त्या त्या खेळातील संघ व्यवस्थापन एका लीगमधील अनुभव आणि प्रयोग दुसऱ्या लीगमध्ये करतात, त्याचा फायदा त्यांना होत असतो. त्यामुळे विचार बदलतात

प्रो कबड्डी पुन्हा ट्रॅकवर

टीव्ही प्रेक्षकांप्रमाणे प्रत्यक्ष सामन्याला येणारे प्रेक्षकही महत्त्वाचे असतात. आपल्याकडे अजून खास कबड्डीसाठी स्टेडियम्स नाही. अशा वेळी प्रो कबड्डीच्या रूपाने त्या त्या शहरात उच्च श्रेणीची कबड्डी पाहायला मिळणे महत्त्वाचे असते, पुन्हा कबड्डीशी नाते जुळवणे आम्ही या पर्वातून साध्य केले. प्रत्येक संघ या वेळी आपल्या शहरात खेळला त्यामुळे प्रो कबड्डीला पुन्हा पूर्वीचे रूप प्राप्त झाले.

यजमान संघासाठी मिळालेला रिस्पॉन्स अफलातून होता. प्रत्येक शहरासाठी त्यांचा संघ आपला आणि जवळचा होता. तरुण वर्ग प्रत्यक्ष सामने पाहायला येत होता. त्यात मुलींचा सहभाग लक्षणीय असा दिसत होता. काही ठिकाणी तर लहान लहान मुलांना घेऊन त्यांचे पालक येत होते. ही आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे.

यातून पकड किती घट्ट आहे हे दिसून येत होते. थोडक्यात तर कौटुंबिक अनुभव होता. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी सुविधा कशा देतो हे महत्त्वाचे ठरते. असे प्रेक्षक मैदानात आल्यावर त्यांना कबड्डीशी कसे एकरूप करतो ही आमची जबाबदारी होते. स्टेडियम आणि टीव्हीवरील प्रेक्षक वेगवेगळे असतात.

सामुदायिक अनुभव आणि अनुभूती कोणत्याही खेळासाठी महत्त्वाची असते. प्रेक्षक अनुभव घेण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी मैदानात येत असतात. नव्या सुरुवातीत आमच्यासाठी हा अनुभव महत्त्वाचा असतो. तसेच प्रत्येक संघासाठी त्यांचा प्रेक्षकवर्ग कोण आहे हे त्यांना समजायला हवे.

टीआरपीमध्ये वाढ

टीआरपीच्या दृष्टीने म्हणायचे, तर आमची कबड्डीशी असलेले नाते घट्ट आहे. ही आयपीएलनंतरची ही दुसऱ्या क्रमांकाची लीग आहे. क्युमिलिटिव्ह प्रेक्षकसंख्या २०० मिलियनच्या वरची आहे. गतवर्षीच्या तुलनेत १६ ते १८ टक्के वाढ झालेली आहे. ही वाढ साखळी स्पर्धेतच झाली होती. प्ले ऑफमध्ये तर त्याहून अधिक टीव्ही प्रेक्षकवर्ग आम्हाला मिळाला.

परदेशी खेळाडूंचा टक्का वाढवला पाहिजे. काही खेळाडूंना काही मिनिटांसाठी खेळवायला हवे. पण संघांच्या प्लॅनमध्ये कसे बसेल सांगता येत नाही. पण आपल्या कोचेसना विश्वास पाहिजे. पण कोरोना महासाथीनंतर ही संख्या मर्यादित झाली. व्हिसाचीही अडचण येत असते. काही देशांतील खेळाडूंची संख्या वाढू शकेल. आंतरराष्ट्रीय कबड्डी विकसित करायला हवी. त्यांची कक्षा वाढवून सक्षम करायला हवी, त्यातूनच जागतिक कबड्डीचे भले होईल.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

कबड्डी हा खेळ अतिशय वेगवान आहे. मुळात हा शरीरवेधी खेळ आहे. त्यामुळे खेळाडूंना हँडटच झाला की नाही हे दूरवरून कळणे सोपे नसते. तलवारबाजीत तसा सुट असतो त्यामुळे हलकाचा टचही कळतो पण ते कबड्डीत शक्य नाही, मात्र आपले रेफ्री आता अधिक सक्षम होत आहेत. त्यानंतर रीव्ह्यूची संख्या कमी झालीय यावरून रेफ्रींच्या अचूक निर्णयाची संख्या वाढली आहे. सध्या ज्याची चर्चा आहे त्या ‘एआय’ मधून नव्या तंत्रज्ञानाचा मार्ग मिळू शकेल.

(शब्दांकन : शैलेश नागवेकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.