Most Expensive Pro Kabaddi Auction 2024: प्रो कबड्डी लीग २०२४ चा लिलाव मुंबईत पार पडत आहे आणि यात खेळाडूंनी कोटींची उड्डाणं घेतलेली पाहायला मिळत आहेत. राजस्थानचा २५ वर्षीय सचिन तनवर ( Sachin Tanwar ) हा आतापर्यंत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे आणि प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात सर्वाधिक रक्कम घेणारा तो दुसरा महागडा भारतीय खेळाडू ठरला.
इराणच्या मोहम्मद्रेझ शाड्लोई चियानेह ( Mohammadreza Shadloui Chiyaneh ) याच्यासाठी हरयाणा स्टीलर्सने २.०७ कोटी मोजल्यानंतर तो सर्वाधिक महागडा खेळाडू असेल असे वाटत होते. पण, सचिनने त्याला मागे टाकले... तेलगू टायटन्सने ७० लाखांच्या बोलीसह सचिनला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर यूपी योद्धा, गुजरात जायंट्स यांनी शर्यतीत उडी मारल्याने सचिनची किंमत एक कोटीच्या वर गेली.
राजस्थानच्या या चढाईपटूने २०२३च्या पर्वात २२ सामन्यांत १८४ चढाईचे गुण जिंकले आणि त्यामुळे त्याच्यासाठी सर्वच संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. पाटना पायरट्सला आपल्या खेळाडूला स्वतःकडे राखण्यासाठी FBM म्हणजेच फायनल बिड मॅचचा पर्याय होता. पण, त्यांनी सचिनला जाऊ दिले. तमिळ थलाइव्हाजने त्याच्यासाठी २.१५ कोटी रुपये मोजून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
२०२३च्या ऑक्शनमध्ये तेलगू टायटन्सने २.६१ कोटींत पवन सेहरावतला आपल्या ताफ्यात घेतले आणि तो प्रो कबड्डी लीग इतिहासातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला.
इराणचा अष्टपैलू मोहम्मद्रेझा प्रो कबड्डीच्या १०व्या पर्वात सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला होता. त्याच्यासाठी पुणेरी पलटनने २.३५ कोटी मोजले होते. यावेळी त्याला २.०७ कोटीच मिळाले. त्यानंतर गुमान सिंगला १.९७ कोटींत गुजरात जायट्सने, पवन सेहरावतला १.७२ कोटींत तेलगू टायटन्सने आणि भरतला १.३० कोटींत यूपी योद्धाने खरेदी केले.