हैदराबाद : साखळी स्पर्धेत अव्वल नंबरी कामगिरी करणाऱ्या पुणेरी पलटणने माजी विजेत्या पाटणा पायरेटस्चा ३७-२१ असा धुव्वा उडवून सलग दुसऱ्यांदा प्रो कबड्डीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शुक्रवारी होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात त्यांचा मुकाबला हरियाना स्टिलर्स संघाशी होईल.
यंदाच्या स्पर्धेत साखळीत २२ पैकी १७ सामने जिंकणाऱ्या पुणे संघाने तोच आक्रमक खेळ आज झालेल्या उपांत्य फेरीतही कायम राखला. दिल्लीचे आव्हान मोडून उपांत्य फेरी गाठणाऱ्या पाटणाला त्यांनी उत्तरोत्तर सामन्यातून जवळपास दूरच करून टाकले होते. जबरदस्त फॉर्मात असलेला पुण्याचा कर्णधार अस्लम इनामदार पुन्हा एकदा आपल्या संघाचा खेळाडू तसेच कर्णधार म्हणूनही महत्त्वपूर्ण ठरला. त्याने २३ चढायांत ७ गुण मिळवले; परंतु त्याची कोर्टवरची उपस्थिती संघातील इतर खेळाडूंचा जोश वाढवत होती.
अस्लमला मोहित गोयत आणि पंकज मोहिते या चढाईपटूंनी तेवढीच मोलाची साथ दिली. इराणचा बचावपटू मोह्मद्रेझा याने बचावात ५ गुण मिळवत पाटणाचे आक्रमण खिळखिळे केले. हाच मोह्मद्रेझा गतवर्षी पाटणाचा खेळाडू होता. उपांत्य फेरीच्या सामन्याची सुरुवात समसमान होती, पहिल्या दहा मिनिटांत ८-८ अशी बरोबरी होती. या वेळी पकडींवरच अधिक गुण मिळवले जात होते; परंतु पाटणाचे हुकमी चढाईपटू सचिन तन्वर आणि सुधाकर यांच्या पकडी करून पुण्याने वर्चस्व मिळवीत आपला अंतिम फेरीतील प्रवेशही निश्चित केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.