मुंबई : राखेतून झेप घेण्याच्या वृत्तीला मुंबई क्रिकेटमध्ये ‘खडूस’ खेळ म्हणून संबोधले जाते. हीच वृत्ती पुन्हा एकदा दाखवत मुंबईने रणजी करंडक अंतिम सामन्यात दाखवली आणि विदर्भला बॅकफूटवर टाकत पकड मिळवली. अगोदर गोलंदाजांची त्यानंतर अजिंक्य रहाणे-मुशीर खानची कमाल यामुळे मुंबईने दोन बाद १४१ धावा करून २६० धावांची आघाडी घेतली.
वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी अंतिम सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांचा खेळ मुंबई संघासाठी परस्परविरोधी ठरला. पहिल्या दिवशी बेजबाबदार फलंदाजीमुळे संकटात सापडलेल्या मुंबईचे हेलकावणारे तारू शार्दुल ठाकूर आणि आज गोलंदाजांनी सावरले. त्यानंतर रहाणे-मुशीर यांनी नाबाद १०७ धावांची भागीदारी करून अजिंक्यपदाच्या दिशेने मार्गस्थ केले.
धवल कुलकर्णी-शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी तीन विकेट मिळवल्यामुळे मुंबईने विदर्भचा डाव १०५ धावांत गुंडाळला आणि ११९ धावांची भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर पृथ्वी शॉ आणि भुपेन लालवानी हे सलामीवीर ३४ धावांत परतल्यावर मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर दोन बाद १४१ अशी मजल मारली. रहाणे ५८, तर मूशीर ५१ धावांवर नाबाद राहिले.
संक्षिप्त धावफलक : मुंबई, पहिला डाव : २२४. विदर्भ, पहिला डाव : ४५.३ षटकात सर्वबाद १०५ (अर्थव तायडे २३, आदित्य ठाकरे १९, यश राठोड २७, यश ठाकूर १५, शार्दुल ठाकूर ९-०-२२-१, धवल कुलकर्णी ११-५-१५-३, शम्स मुलानी १२-०-३२-३, तनुष कोटियन ४.३-१७-३). मुंबई, दुसरा डाव : २ बाद १४१ (पृथ्वी शॉ ११, भुपेन लालवानी १८, मुशीर खान खेळत आहे ५१, अजिंक्य रहाणे खेळत आहे ५८, यश ठाकूर २५-१, हर्ष दुबे ४६-१).
विदर्भने आज डाव सुरू केला तेव्हा सलामीवीर अर्थव तायडे आणि नाईट वॉचमन आदित्य ठाकरे मैदानावर होते; परंतु सुरुवातीलाच धवल कुलकर्णीने अथर्वच्या बॅटची कडा घेऊन त्याला यष्टीरक्षकाकडे झेल द्यायला भाग पाडले. विदर्भसाठी हा मोठा धक्का होता. मात्र, आदित्यने कसलेल्या फलंदाजाप्रमाणे किल्ला लढवला. यश ठाकूरसह पाचव्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली तरी विदर्भवरचे संकट टळले नव्हते.
दरम्यान, मुंबई कर्णधार अजिंक्य रहाणेने डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलानीला आक्रमणावर लावले त्याचे काही चेंडू वळत असल्यामुळे विदर्भसाठी ती धोक्याची घंटा होती. आदित्य ठाकरे चकला होता; परंतु त्याचा झेल सिली पॉईंटला लालवानीला टिपता आला नाही. मात्र, मुंबईसाठी हे जीवदान महागात पडले नाही. मुलानीने आपल्या पुढच्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर बाद केले.
मुलानी धोकादायक ठरू लागला होता, कारण आपल्या पहिल्याच चेंडूवर त्याने विदर्भ कर्णधार अक्षय वाडकला बाद केले. मुंबई यष्टीरक्षक तामोरे याने त्याला झेल पकडला. यावेळी मुलानी हॅटट्रिकवर होता. ती संधी त्याला मिळाली नाही; परंतु आपल्या पुढच्या षटकात त्याने हर्ष दुबे यालाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
आता दुसऱ्या बाजूने तनुष कोटियन गोलंदाजीस आला आणि दुतर्फा फिरकी आक्रमक सुरू झाले. तनुषनेही तीन विकेट मिळवल्या. त्यामुळे पहिल्या सत्राचा खेळ संपता संपता विदर्भचा डाव १०५ धावांत संपला. या सत्रात विदर्भने ३२ षटकांत सात फलंदाज गमावले आणि त्यांना केवळ ७३ धावांच करता आल्या.
यंदाच्या रणजी मोसमातील अखेरच्या सामन्यातील अखेरच्या डावात संघाला गरज असताना रहाणेला फॉर्म गवसला. सर्व अनुभव पणाला लावत त्याने फारच संयमी आणि १०९ चेंडूंत ५८ धावांची खेळी केली. या मोसमातले रहाणेचे हे दुसरेच अर्धशतक आहे. पहिल्या डावात तो केवळ सात धावाच करू शकला होता.
एरव्ही आक्रमक फलंदाजी करणाऱ्या मुशीर खाननेही आज रहाणेला उत्तम साथ देत त्याच्याप्रमाणेच फारच संयमी फलंदाजी केली. ८६ चेंडूंत २५ धावा केल्यानंतर त्याने पहिला चौकार मारला. दिवसाचा खेळ संपता संपता त्याने अर्धशतक केले.
या मोसमात फॉर्मसाठी झगडणाऱ्या अजिंक्य रहाणेने आज संघाला गरज असताना केलेली नाबाद अर्धशतकी खेळी त्याच्यासाठीच नव्हे तर संघातील सर्वांसाठी मोलाची ठरली. चौकार मारून अर्धशतक झळकावल्यावर रहाणे याने बॅट उंचावून केलेले अभिवादन शतक केल्यासारखे होते. ती भावना आम्हा सर्वांना आनंद देणारी ठरली, असेही मुलानीने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.