धरमशाला : भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी इंग्लंडचा धुव्वा उडवत पाच कसोटी सामन्यांची मालिका ४-१ अशी खिशात टाकली. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिका विजयात खेळाडू, कर्णधार, सपोर्ट स्टाफ, निवड समिती या सर्वांचेच मोलाचे योगदान होते, अशा शब्दांत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी अखेरची कसोटी संपल्यानंतर कौतुक केले.
विजयासारखा दुसरा आनंद नाही. त्यातून विजय जर संघर्ष करून मिळवला असेल तर तो अजून स्मरणात राहतो. मला वाटते, की हैदराबाद कसोटी सामना गमावल्यावर भारतीय संघाने धीर गमावला नाही. ड्रेसिंग रूममधील वातावरण तसेच हलकेफुलके ठेवले. सकारात्मकता कायम ठेवली आणि त्याचा योग्य परिणाम झाला.
याला कर्णधार रोहित शर्माबरोबर माझ्यासोबत काम करणारा संपूर्ण सपोर्ट स्टाफ कारण आहे. त्याच्या सोबतीला मला खास उल्लेख निवड समितीचा म्हणजेच अजित आगरकर आणि त्याच्या सहकाऱ्यांचा करायचा आहे. कित्येक वेळेला आम्ही प्रथम श्रेणीचे सामने पूर्ण बघू शकत नाही; मात्र निवड समिती सदस्य भरपूर प्रमाणात असे सामने बघत असतात. नव्या खेळाडूंचा शोध घेत असतात. या वेळी अजितने काही नवे खेळाडू सुचवले.
मला वाटते या मालिकेत संधी मिळाल्यावर नव्या दमाच्या खेळाडूंनी केलेली कामगिरी लक्षणीय होती. त्यासाठी निवड समितीला श्रेय द्यायला हवे. म्हणून मला वाटते, की इंग्लंडसमोरच्या मालिकेत मिळवलेला ४-१ या विजयात सर्वांचाच सहभाग आहे, असे राहुल द्रविड या वेळी म्हणाला.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या संघाने खराब कामगिरी केली हे मान्य न करता भारतीय संघाने वरचढ खेळ केला, असे सांगून बाजू मारून नेली. स्वत: बेन स्टोक्ससह बाकी प्रमुख इंग्लंडच्या फलंदाजांना सातत्य राखलेले अपयश मात्र लपून राहिले नाही. इंग्लंडच्या माध्यमांनी संघाच्या दारुण पराभवावरून चांगलेच कोरडे ओढले आहेत. पाचव्या सामन्यातील सुमार कामगिरीवरून टीका करताना खेळाडूंना सामन्यापेक्षा घरी परतण्याचे वेध जास्त लागले असल्याची टिप्पणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.