Vinesh Phogat Join Congress : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया हे दोन तगडे खेळाडू आज दुपारी १.३० वाजता काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची बातमी आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत १०० ग्रॅम वजन अधिक आढळल्यानंतर विनेशला फायनल खेळण्यापासून रोखले गेले. अपात्रतेच्या कारवाईविरोधात भारतीय कुस्तीपटूने क्रीडा लवादाकडे दादही मागितली, परंतु तिची याचिका फेटाळण्यात आली. ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या फायलनमध्ये प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू होती, परंतु ऑलिम्पिक समितीच्या निर्णयामुळे तिला स्पर्धेत थेट शेवटच्या स्थानावर जाऊन बसवले.
या निर्णयाने नाराज झालेल्या विनेशने कुस्तीतून निवृत्तीचा निर्णय घेतला. पॅरिसमधून मायदेशात परतल्यानंतर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. हरयाणातील गावागावात तिचा सत्कार केला गेला. खाप पंचायतिने तर विनेशला सोन्याचं पदक देऊन गौरविले होते. आता तिची राजकारणात एन्ट्री निश्चित मानली जात आहे. विनेश व बजरंग यांनी बुधवारी नवी दिल्लीत विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर बैठकीचे छायाचित्रही पोस्ट केले होते.
काँग्रेस पक्षाने विनेश फोगाटला हरियाणातील तीनपैकी कोणत्याही विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. या तीन जागांमध्ये चरखी-दादरी, बधरा आणि जुलाना या जागांचा समावेश आहे. चरखी दादरी हा विनेश फोगाटचा जिल्हा आहे आणि जाटबहुल क्षेत्र आहे. बधरा हे विनेश फोगाटच्या बलाली गाव त्या अंतर्गत येते. या गावातून विनेशने कुस्तीच्या आखाड्यात प्रवेश केला आणि आज ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू आहे. जुलाना हे तिचे सासरचे घर आहे. जिथून राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सोमवीर राठी येतात.