Cristiano Ronaldo record-setting journey : पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो हा रोज जेवणात रेकॉर्ड खातो असं वाटू लागले आहे. जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या रोनाल्डोने नुकताच कारकीर्दित ९०० गोल करणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान पटकावला... त्याआधी त्याने सुरू केलेल्या यू ट्यूब चॅनेलने काही तासांतच विक्रमी झेप घेतली आणि आज तर त्याने '१०० कोटी' चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली.
पोर्तुगाल आणि अल नासरकडून खेळणाऱ्या दिग्गज फुटबॉलपटूने सोशल मीडियावर खास विक्रम नोंदवला आहे. सोशल मीडियावर एक अब्ज म्हणजेच १०० कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठणारा तो पहिला व्यक्ती ठरला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोनाल्डोची लोकप्रियता त्याच्या नव्या यू ट्यूब चॅनेलमुळे वाढली आहे.
३९ वर्षीय रोनाल्डोने यू ट्यूब अकाऊंट सुरू केले आणि एका आठवड्यातच त्याच्या फॉलोअर्सची संख्या ५० दशलक्ष म्हणजेच पाच कोटींच्या पुढे गेली. रोनाल्डोचे इन्स्टाग्रामवर ६३९ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. मँचेस्टर युनायटेड आणि रेआल माद्रिदच्या या माजी खेळाडूचे फेसबुकवर १७०.५ दशलक्ष म्हणजेच १७ कोटी फॉलोअर्स आहेत आणि 'X' वर ११३ दशलक्ष म्हणजेच ११ कोटी फॉलोअर्स आहेत. चिनी प्लॅटफॉर्म Weibo आणि Kuaishou वर त्याचे काही फॉलोअर्स आहेत.
रोनाल्डोने चाहत्यांचे आभार मानले. त्याने लिहिले की,'आपण इतिहास घडवला आहे. १ अब्ज फॉलोअर्स! ही फक्त एक संख्या नाही, तर तुमचं प्रेम आहे. मदेइराच्या रस्त्यांपासून ते जगातील सर्वात मोठ्या टप्प्यांपर्यंत, मी नेहमीच कुटुंबासाठी आणि तुमच्यासाठी खेळलो. प्रत्येक चढ-उतारात तुम्ही माझ्या सोबत होता. आपण दाखवून दिले आहे की आपण काय साध्य करू शकतो आणि त्याला मर्यादा नाहीत. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, तुमच्या समर्थनासाठी आणि माझ्या आयुष्याचा एक भाग असल्याबद्दल धन्यवाद.''