पॅरिस - अॅश्ले बार्ती, नाओमी ओसाका यांच्यापाठोपाठ आता रॉजर फेडररनेही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. आपल्या टीमसह चर्चा केल्यानंतर फेडररने हा निर्णय घेतला असल्याचे संयोजकांनी जाहीर केले. फेडररने तिसऱ्या फेरीत डॉमिनिक कोएपफेर याला ७-६ (७-५), ६-७ (३-७), ७-६ (७-४), ७-५ असे नमवले. ही प्रकाशझोतातील लढत शनिवारी मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास संपली. चौथ्या फेरीची लढत मी खेळणार का, हे सांगणे अवघड आहे, अशी टिप्पणी त्याने केली होती. तो म्हणाला, मला याबाबत निर्णय घ्यावा लागेल. गुडघ्यांवर किती ताण देणार, हा प्रश्नच आहे.
चाळिशीतील फेडररच्या गुडघ्यावर गतवर्षी दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. विम्बल्डन जेतेपद त्याला खुणावत आहे. ही स्पर्धा २८ जूनपासून आहे. या स्पर्धेसाठीच त्याने फ्रेंच स्पर्धा अर्धवट सोडून दिली असल्याची चर्चा सुरू आहे. आता तो हॅले स्पर्धेत खेळणार आहे. तेथील विजेतेपदानंतर गुडबाय करण्याचा त्याचा विचार असल्याचे टेनिस अभ्यासकांचे मत आहे. यंदा तो तीन स्पर्धा खेळला आहे. प्रत्येक लढतीचा गुडघ्यावर किती ताण पडतो, हे लक्षात घेतो. लढतीच्या दिवशी माझा गुडघा कसा आहे, याचाही विचार करतो. लढत लांबल्यावर हा विचार जास्त गांभीर्याने करतो, असे तो म्हणाला. फेडररची तिसऱ्या फेरीची लढत साडेतीन तास चालली.
नदाल फेडररपेक्षा सरस
एका ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक विजय नोंदवण्याच्या स्पर्धेत राफेल नदालने फेडररला मागे टाकले. नदालने फ्रेंच ओपन स्पर्धेत १०३ विजय मिळवत एका स्पर्धेत सर्वाधिक १०२ विजय मिळवण्याचा फेडररचा विक्रम मागे टाकला. आश्चर्य म्हणजे फेडररची ही कामगिरी ऑस्ट्रेलियन स्पर्धेत आहे.
सर्वाधिक विजय
१०३ राफेल नदाल, फ्रेंच ओपन
१०२ रॉजर फेडरर, ऑस्ट्रेलियन ओपन
१०० रॉजर फेडरर, विम्बल्डन
९८ जिमी कॉनर्स, अमेरिकन ओपन
८९ रॉजर फेडरर, अमेरिकन ओपन
१२९ मार्टिना नवरातिलोवा, विम्बल्डन
१०६ सेरेना विल्यम्स, अमेरिकन ओपन
१०१ ख्रिस एव्हर्ट, अमेरिकन ओपन
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.