Rohit Sharma On Virat Kohli : भारताने अफगाणिस्तानविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत मालिका 3 - 0 अशी खिशात टाकली. भारताने अफगाणिस्तानसमोर 212 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र अफगाणिस्तानने देखील 212 धावा केल्याने सामना टाय झाला.
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने 15 तर भारताने देखील 15 धावा केल्याने सुपर ओव्हर देखील टाय झाली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने 11 धावा केल्या. मात्र अफगाणिस्तानचे दोन फलंदाज 1 धावेवर बाद झाले अन् भारताने सामना आणि मालिका देखील जिंकली.
दरम्यान, बंगळुरूच्या पाटा खेळपट्टीवर खेळताना देखील भारताची रन मशिन विराट कोहली शुन्यावर बाद झाला. तो आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाला होता. तर संजू सॅमसन देखील अशाच प्रकारे पहिल्याच चेंडूवर बाद झाला.
याबद्दल जिओ सिनेमाशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, 'आम्ही आमच्या खेळाडूंना त्यांच्या स्थानाबद्दल आणि त्यांच्याकडून संघाला कशा प्रकारच्या खेळाची अपेक्षा आहे हे स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. आमच्या खेळाडूंना ज्यावेळी ते मैदानावर येतात त्यावेळी त्यांना काय करायचं आहे हे माहिती असतं.'
'आज आपण पाहिलं की विराट कोहलीने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला. तो सहसा असं करत नाही. मात्र त्यानं आपला इरादा स्पष्ट केला. संजू सॅमसनचं देखील तसंच आहे. तो पहिल्या चेंडूवर बाद झाला. मात्र त्यानं देखील आक्रमक खेळण्याचा इरादा दाखवून दिलं.'
टी 20 वर्ल्डकप जिंकण्याबाबत देखील रोहित शर्माने वक्तव्य केलं. तो म्हणाला, 'पाहा मी सध्या तरी टी 20 वर्ल्डकपबाबत विचार करत नाहीये. वनडे वर्ल्डकप जिंकणं हे माझं स्वप्न होतं. पण मी टी 20 वर्ल्डकपचा आदर करत नाही असं नाही. टी 20 वर्ल्डकप आणि आयसीसी कसोटी अजिंक्यपद या महत्वाच्या स्पर्धा आहेत.
मी वनडे वर्ल्डकप पाहत मोठा झालो आहे. ज्यावेळी वर्ल्डकप भारतात होतो त्यावेळी एक वेगळीच उर्जा असते. आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न केले मात्र स्वप्न काही पूर्ण होऊ शकले नाही. संपूर्ण संघ निराश झाली होती. मला खात्री आहे की लोकांना देखील राग आला असणार मात्र आमच्याकडे टी 20 वर्ल्डकप जिंकण्याची संधी आहे. आशा आहे की आम्ही तो जिंकू.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.