Rohit Sharma SA vs IND 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या (दि. 02) केपटाऊन येथे खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता. त्यांनी भारताचा तिसऱ्या दिवशीच एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला होता. आता भारताला मालिका बरोबरीत आणण्यासाठी दुसरा सामना जिंकावाच लागणार आहे.
दरम्यान, पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात संघात काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित शर्मा सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेला सामोरा गेला.
रोहित प्लेईंग 11 बाबत पत्रकार परिषदेत म्हणाला, 'हे बघा मी या गोष्टीचा फार विचार करत नाही. आम्ही संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांसोबत थोडक्यात चर्चा केली आहे. आम्ही अजून प्लेईंग 11 पूर्णपणे निश्चित केलेली नाही. संघात सध्या कोणीही दुखापतग्रस्त नाहीये. सर्व खेळाडू निवडीसाठी उपलब्ध आहेत.'
रोहित शर्मा पुढे म्हणाला की, 'आम्ही संध्याकाळी बैठक घेऊ आणि काय योग्य असेल ते करू. हे सांगत असताना मी अजून एक गोष्ट स्पष्ट करतो की आमच्या गोलंदाजीत अनुभवाची कमतरता आहे. मात्र आम्हाला त्यांच्यावर विश्वास दाखवायला हवा. हे सर्व संघात होतं.'
रोहित शर्माने प्रसिद्ध कृष्णाला पाठिंबा दिला. त्याने गेल्या सामन्यातच पदार्पण केलं आहे. रोहित म्हणाला की, 'पहिला सामना खेळताना आपण सर्वजण नर्वस होतो. मला अजूनही वाटतं की प्रसिद्धकडे खूप क्षमता आहे. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच यशस्वी होऊ शकतो.'
दुसरा सामना हा केप टाऊन येथे होत आहे. भारताची या ग्राऊंडवर कामगिरी सुमार झाली आहे. आतापर्यंत भारताने केप टाऊनच्या न्यूलँड्सवर 6 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 4 सामने गमावले असून 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.