Sa vs Ind Rinku Singh : पावसाने प्रभावित झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 19.3 षटकांत सात विकेट गमावत 180 धावा केल्या. भारतीय डावातील शेवटच्या षटकात पावसाने व्यत्यय आणला आणि संघाचा डाव तिथेच संपला.
डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला 15 षटकांत 152 धावांचे लक्ष्य मिळाले. आफ्रिकन संघाने हे लक्ष्य सहज गाठले. आफ्रिकेकडून रीझा हेंड्रिक्सने अप्रतिम कामगिरी केली.
सलामीवीरांनी दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात करून दिली. रीझा हेंड्रिक्स आणि मॅथ्यू ब्रेट्झके यांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. मॅथ्यूने 16 धावा केल्या. यानंतर एडन मार्करामने 17 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकारासह 30 धावा केल्या. हेंड्रिक्स आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही आणि 49 धावा करून बाद झाला, पण त्यानेच दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला.
डेव्हिड मिलरने 17 धावांचे योगदान दिले. एंडिले फेहलुकवायोने षटकार ठोकत संघाला विजयाकडे नेले. त्याने संघासाठी 4 चेंडूत 10 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सने 14 धावा केल्या. कोणताही गोलंदाज भारतासाठी कोणताही प्रभाव सोडू शकला नाही. मुकेश कुमारने संघाकडून 2 विकेट्स घेतल्या. पण तो खूप महागडा ठरला. त्याने 3 षटकात 34 धावा दिल्या. याशिवाय मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी 1-1 विकेट घेतली.
भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र यानंतर तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी शानदार फलंदाजी केली. तिलक 29 धावा करून बाद झाला. यानंतर सूर्या आणि रिंकू सिंग यांच्यात चौथ्या विकेटसाठी 48 चेंडूत 70 धावांची भागीदारी झाली. या दोन खेळाडूंमुळेच संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.
रिंकू-सूर्याने झळकावली अर्धशतके
सूर्यकुमारने आपल्या स्फोटक फलंदाजीने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. सूर्यकुमारने 36 चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि तीन षटकार लगावत 56 धावा केल्या. रिंकूने 39 चेंडूंत 68 धावांच्या नाबाद खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकले. त्याचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिले अर्धशतक आहे.
रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकांमध्ये 14 चेंडूत एक चौकार आणि एक षटकार मारत 19 धावा केल्या. पण जेव्हा टीम इंडियाने 19.3 षटकांनंतर 7 विकेट गमावून 180 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाऊस आला आणि भारतीय डाव पुन्हा आला नाही. यानंतर पंचांनी सामना 15-15 षटकांचा केला आणि दक्षिण आफ्रिकेला 152 धावांचे लक्ष्य मिळाले. दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक 3 बळी घेतले.
रिंकू सिंगने 2023 साली आयर्लंडविरुद्ध भारताकडून पदार्पण केले. त्यानंतर त्याने भारतासाठी 11 सामन्यात 248 धावा केल्या आहेत. पण त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदाच अर्धशतक झळकावले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाला असला तरी ही खेळी त्यांच्या कायम लक्षात राहील. रिंकूने आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी चांगली कामगिरी केली. याच कारणामुळे त्याला टीम इंडियात संधी मिळाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.