Thailand Open Badminton : सात्विक - चिराग जोडीला विजेतेपद ; थायलंड ओपन बॅडमिंटन,मोसमातील दुसरे अजिंक्यपद

सात्विक साईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी या भारताच्या जोडीने रविवारी थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत विजेतेपदावर नाव कोरले. सात्विक - चिराग जोडीने अजिंक्यपदाच्या लढतीत चीनच्या चेन यांग - लिऊ यी या जोडीवर २१-१५, २१-१५ अशी मात केली. भारतीय जोडीने यंदाच्या मोसमातील हे दुसरे जेतेपद ठरले.
Thailand Open Badminton
Thailand Open Badmintonsakal
Updated on

बँकॉक : सात्विक साईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी या भारताच्या जोडीने रविवारी थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत विजेतेपदावर नाव कोरले. सात्विक - चिराग जोडीने अजिंक्यपदाच्या लढतीत चीनच्या चेन यांग - लिऊ यी या जोडीवर २१-१५, २१-१५ अशी मात केली. भारतीय जोडीने यंदाच्या मोसमातील हे दुसरे जेतेपद ठरले. या दमदार कामगिरीमुळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये आधी भारतीय जोडीचा आत्मविश्‍वास नक्कीच उंचावला असेल.

सात्विक - चिराग जोडीला या स्पर्धेत अव्वल मानांकन देण्यात आले होते. त्यामुळे जेतेपदाच्या लढतीत भारतीय जोडीवर दबाव होता. पहिल्या गेममध्ये भारतीय खेळाडूंनी ५-१ अशी आघाडी मिळवत शानदार सुरुवात केली; पण सलग चार गुण मिळवत चीनच्या खेळाडूंनी पुनरागमन केले.

चीनच्या खेळाडूंनी ३९ रॅलीच्या खेळात महत्त्वाचा गुण मिळवत १०-७ अशी आघाडी घेतली. सात्विक - चिराग जोडीने दमदार रिटर्न करीत १०-१० अशी बरोबरी साधली. ब्रेकमध्ये चीनची जोडी किंचित पुढे होती. त्यानंतर भारतीय जोडीने १६-१२ अशी आघाडी घेत पहिला गेम जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले. अखेर सात्विक - चिरागने पहिला गेम २१-१५ असा आपल्या नावावर केला.

सात्विक - चिराग जोडीने दुसऱ्या गेमची सुरुवात धडाकेबाज केली. ८-३ अशी आघाडी मिळवत चीनच्या जोडीला बॅकफूटवर टाकले. त्यानंतर भारतीय जोडीकडे १५-११ अशी आघाडी असताना सात्विकला पंचांकडून ताकीद देण्यात आली. खेळामध्ये विलंब आणत असल्याची तक्रार करण्यात आली. चीनच्या खेळाडूंनी याचदरम्यान १४-१५ अशी आघाडी कमी केली. मात्र, भारतीय जोडीने १७-१५ अशी महत्त्वाची दोन गुणांची आघाडी मिळवत पुढे जाऊन दुसऱ्या गेममध्ये २१-१५ असे यश मिळवले. भारतीय जोडीने ४६ मिनिटांमध्ये विजय साकारला.

सात्विक - चिराग या जोडीने या मोसमात मार्च महिन्यात फ्रेंच ओपन स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. तसेच मलेशिया सुपर १००० व इंडिया सुपर ७५० या दोन स्पर्धांमध्ये या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. गेल्या काही स्पर्धांमध्ये या जोडीकडून निराशा झाली होती. ऑल इंग्लंड अजिंक्यपद, थॉमस करंडक या दोन्ही स्पर्धांमध्ये अपयशाचा सामना करावा लागला होता. सात्विकच्या दुखापतीमुळे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमधून जोडीने माघारही घेतली होती.

आमच्यासाठी ‘लकी’ स्पर्धा

सात्विक साईराज रंकीरेड्डी याने जेतेपदानंतर आपले मत व्यक्त करताना म्हटले की, २०१९मध्ये आम्ही थायलंड ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर आम्ही प्रगतिपथावर रूढ झालो. अनेक स्पर्धा जिंकण्यात आम्हाला यश मिळाले. यंदाही या स्पर्धेच्या जेतेपदामुळे आगामी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल. याच कारणामुळे आमच्यासाठी थायलंड ओपन स्पर्धा ‘लकी’ आहे.

थायलंड ओपनचे जेतेपद पुरुष दुहेरीच नव्हे तर इतर दुहेरी विभागातील खेळाडूंसाठी तसेच भारतातील असंख्य युवा खेळाडूंसाठी प्रेरणा देणारे ठरणार आहे. चीन किंवा इंडोनेशिया या देशांतील खेळाडू आपल्यापेक्षा वरचढ आहेत, असे कित्येकांना वाटते; पण आमच्या विजेतेपदामुळे युवा खेळाडूंची विचारसरणी बदलेल आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूंना हरवण्यासाठी त्यांची पावले सरसावतील.

-चिराग शेट्टी, बॅडमिंटनपटू, भारत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.