Schoolympics 2023 : कबड्डीत मुलींमध्ये थेरगावच्या पिंपरी चिंचवड महापालिका विद्यालयाचे वर्चस्व

Schoolympics 2023 : कबड्डीत मुलींमध्ये थेरगावच्या पिंपरी चिंचवड महापालिका विद्यालयाचे वर्चस्व
Updated on

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : पुणे, ता. १ : स्कूलिंपिकच्या कबड्डीमध्ये मुलांच्या विभागात नायगावच्या हाय व्हीजन इंटरनॅशनल स्कूलने सुवर्णपदक जिंकले. मुलींमध्ये थेरगावच्या पिंपरी चिंचवड महापालिका माध्यमिक विद्यालयाने बाजी मारली.

स्वारगेट येथील नेहरू स्टेडियमच्या मैदाना ही स्पर्धा पार पडली. मुलांमध्ये हाय व्हिजनने कात्रजच्या सरहद स्कूलवर ४३-२४ असा १९ गुणांच्या फरकाने विजय मिळविला. सुमीश मालपोटेने चढाईत तब्बल २१, तर पकडीत चार गुणांची कमाई करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला. प्रिन्स मौर्यने पकडीत सहा गुण मिळवले.

न्हावरेच्या श्री मल्लिकार्जुन विद्यालयाने शिरूरच्या बालाजी प्राथमिक स्कूलवर ५१-२० असा ३१ गुणांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत ब्राँझ पदक जिंकले.

मुलींच्या विभागात पिंपरी चिंचवड महापालिका माध्यमिक विद्यालयाने शिरूरच्या बालाजी प्राथमिक स्कूलवर ४०-१९ असा २१ गुणांनी विजय संपादन केला. सरस्वती शिवमोरेने चढाईत १२ आणि पकडीत तीन गुण अशी कामगिरी केली. डिंपल उडनशिवेने चढाईत दहा गुण मिळविले. प्रशिक्षिका कीर्ती कडगंची हिच्या मार्गदर्शनाखाली संघाने विजय संपादन केला.

बिबवेवाडीच्या विश्वकर्मा विद्यालयाने ब्राँझ मिळविले. या संघाने प्रियदर्शनी विद्यामंदिरवर ४२-३७ असा पाच गुणांनी विजयी नोंदविला.

कबड्डी प्रतिक्रिया

आमचा स्कूलिंपिकमध्ये खेळण्याचा हा पहिलाच अनुभव होता. तो अत्यंत चांगला ठरला. आमचे टीमवर्क चांगले झाले. सर्वच खेळाडूंनी एकमेकांना उत्तम साथ दिली व मार्गदर्शकांनी चांगले मार्गदर्शन केले. त्यामुळे आज सुवर्णपदक जिंकता आले.

- सुमीश मालपोटे, विजेता खेळाडू, हाय व्हीजन इंटरनॅशनल, नायगाव

सामन्यापूर्वी डावपेचांची आखणी केली. चढाई, पकड कशी करायची, बोनस गुण कसे मिळतील, चढाई कशी करावी याचा सराव आणि सखोल चर्चा झाली. त्याचा उपयोग आम्हाला प्रत्यक्ष सामना खेळताना झाला. अंतिम सामन्यासाठी येताना आमची बस बंद पडली होती. त्यामुळे मैदानावर येण्यास उशीर झाला. सामन्यापूर्वी मानसिक तणाव होता, परंतु सामना जिंकल्यानंतर कष्टाचे चीज झाले व ताण नाहीसा झाला.

- सरस्वती शिवमोरे, कर्णधार, पिंपरी चिंचवड महापालिका माध्यमिक विद्यालय, थेरगाव

सकाळ स्कूलिंपिकमधील हे आमचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. नेहमीप्रमाणेच या वेळीसुद्धा आमच्या संघाला सुवर्णपदक मिळणार असा विश्वास होता. स्पर्धा अत्यंत चांगली झाली.

- कीर्ती कडगंची, प्रशिक्षका, पिंपरी चिंचवड महापालिका माध्यमिक विद्यालय, थेरगाव

ग्रामीण भागातील मुलांना शहरात खेळण्याची संधी सकाळ स्कूलिंपिकमुळे उपलब्ध झाली आहे. हे व्यासपीठ त्यासाठी महत्त्वाचे आहे. स्कूलिंपिक असेच सुरू राहावे. सकाळ माध्यम समूहाचे मनापासून आभारी आहोत.

- जालिंदर जाधव, प्रशिक्षक, श्री मल्लिकार्जुन विद्यालय, न्हावरे

स्पर्धेसाठी सगळी व्यवस्था चांगली होती. अगदी मैदानापासून सर्व सुविधांचे नियोजन उत्तम होते. या स्पर्धेचा आमचा हा पहिलाच अनुभव आहे.

- तुषार शेडगे, प्रशिक्षक, हाय व्हीजन इंटरनॅशनल स्कूल, नायगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.